रत्नागिरी : ‘कोकणातील शेती म्हणजे केवळ व्यवसाय नसून, ती एक जीवनपद्धती आहे. आजचा काळ ‘झटपट’चा असला, तरी शेती हा संयमाचा विषय आहे. शेतीतील समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर मात करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जयंत फडके यांनी लिहिलेले ‘मातीचा जातीचा शेतकरी’ हे पुस्तक प्रत्येकाला दिशा दाखवणारे ठरेल,’ असा विचार मान्यवरांनी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात काढला. जांभूळआड (पूर्णगड, ता. जि. रत्नागिरी) येथील प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२९ जुलै) पावसमधील श्रीराम मंदिरात प्रकाशन झाले. प्रसिद्ध नर्सरी व्यावसायिक विनोद प्रभुदेसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार आणि सत्त्वश्री प्रकाशनचे प्रमोद कोनकर, ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले, प्रगत शेतकरी डॉ. गजानन रानडे, डॉ. श्रीराम फडके आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. (पुस्तक घरपोच मागवण्याविषयी अधिक माहिती बातमीच्या शेवटी दिली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अनोख्या पद्धतीने पुस्तकाचे प्रकाशन झाले. नारळाच्या झावळीपासून विणलेल्या झापाप्रमाणे तयार केलेल्या आकर्षक वेष्टनात पुस्तकाच्या प्रती ठेवण्यात आल्या होत्या. वर लावलेले गुलाबाचे फूल प्रमुख पाहुणे विनोद प्रभुदेसाई यांनी काढले आणि ते वेष्टन उघडले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. कोकणच्या मातीतील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, संघर्ष, समस्या आणि त्यावरील व्यवहार्य मार्ग या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली. ई-बुक लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.)
प्रमुख पाहुणे विनोद प्रभुदेसाई म्हणाले, ‘आज ‘गुगल बाबा’ आल्यापासून प्रत्येकाला आपण सर्वज्ञानी आहोत असे वाटते; पण खऱ्या अनुभवाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. सध्याच्या ‘इन्स्टंट’ संस्कृतीत प्रत्येक गोष्ट १० मिनिटांत हवी असते; पण शेती हा संयमाचा विषय आहे. जयंत फडके यांनी या पुस्तकात केवळ प्रश्नच मांडले नाहीत, तर आपल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यावर नेमके मार्गही सुचवले आहेत. कोकणातील प्रत्येकाला हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.’
पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करताना जयंत फडके म्हणाले, ‘शेती करताना आलेले अनुभव आणि शेतकऱ्यांच्या व्यथा शब्दांत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तरुण पिढीने पुन्हा एकदा श्रद्धेने शेतीकडे वळावे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. जास्तीत जास्त शाळा-महाविद्यालये आणि ग्रंथालयांपर्यंत हे पुस्तक पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.’
प्रमोद कोनकर म्हणाले, ‘कोकणातील लेखकांचे विचार जगासमोर नेणे हे आमचे प्रयत्न आहेत. जयंत फडके यांच्या लेखणीतील तळमळ आहे वाचकांना विचार करायला भाग पाडते. सत्त्वश्री प्रकाशनच्या माध्यमातून अशा सकस साहित्याचा प्रसार करण्यास आम्ही नेहमीच उत्सुक आहोत.’
शिरीष दामले म्हणाले, ‘शेतीचा प्रश्न केवळ अन्नधान्यापुरता मर्यादित नसून, तो संस्कृतीशी जोडलेला आहे. या पुस्तकातील लेख हे केवळ माहितीपर नसून ते अनुभवाचे बोल आहेत आणि ते नव्या पिढीला प्रेरणा देतील. लेखक फडके यांनी हे लेख लिहिताना सम्यक दृष्टीने शेतीकडे पाहिले आहे. त्यात रोमँटिसिझम नाही आणि टोकाची टीकाही नाही. लिहिताना त्यांनी मारलेल्या टपल्या समस्यांची जाणीव करून देतात. आजच्या काळानुरुप शेतीत काय करण्यासारखे आहे, याविषयी त्यांनी लिहिले आहे.’
राजू ताम्हनकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांनी या वेळी जयंत फडके यांच्यावर केलेल्या कवितेचे सादरीकरण केले. प्रगत शेतकरी डॉ. श्रीराम फडके, डॉ. गजानन रानडे यांनीही आपल्या मनोगतातून जयंत फडके यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अॅड. अविनाश काळे यांनी सूत्रसंचालन केले. तन्वी फडके यांनी आभारप्रदर्शन केले.
📲 ई-बुक लिंक :
🔹 अँड्रॉइडसाठी
🔹 वेब ब्राउझर आणि आयफोनसाठी :

