सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे चिपळूणमधील ‘स्वर दिवाळी पहाट’ संस्मरणीय

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे चिपळूणमधील ‘स्वर दिवाळी पहाट’ संस्मरणीय

चिपळूण : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या स्वर दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीस चिपळूणकरांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला.

दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पहाटे चिपळूण नगरीत संगीताची अनोखी अनुभूती आली. पहाटेच्या प्रसन्न, आल्हाददायक वातावरणात सुरू झालेल्या या मैफलीत प्रसिद्ध अभिनेते व गायक अमोल बावडेकर आणि सुप्रसिद्ध गायिका ईशानी पाटणकर यांच्या सुरेल स्वरांनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. बावडेकर यांच्या दमदार आणि भावस्पर्शी गायकीने मैफलीत रंग भरला, तर ईशानी पाटणकर यांच्या मधुर आवाजाने रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमात सादर झालेले एकापेक्षा एक सरस अभंग, भक्तीगीते आणि लोकप्रिय मराठी भावगीतांमुळे सभागृहात भक्तिरस आणि संगीताचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

सणासुदीच्या गडबडीतून वेळ काढत चिपळूणसह जिल्ह्याच्या विविध भागांतून संगीतप्रेमींनी पहाटेच मोठी गर्दी केली होती. सांस्कृतिक कार्य विभागाच्या या दर्जेदार उपक्रमामुळे चिपळूणकरांची दिवाळी पाडव्याची सुरुवात सुरेल आणि अविस्मरणीय ठरली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply