आश्वासनांच्या पावसात वाहून गेले रस्ते

नेहमीच येणारा पाऊस, त्यामुळे कोकणवासीयांची उडणारी दाणादाण, नेहमीच येणारा गणेशोत्सव, त्या काळात चाकरमान्यांना भोगावा लागणारा त्रास वर्षानुवर्षे तसाच आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याच्या आश्वासनांच्या पावसात रस्ते मात्र वाहून गेले आहेत. यापुढेही ते तसेच वाहत राहतील. सण संपवून चाकरमानी परततील. खड्डे विसरतील. अगदी दरवर्षी येणाऱ्या गणपतीप्रमाणेच पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमधून कोकणात आपापल्या गावी येतील.

संस्मरणीय आणि आदर्श स्मृतिसोहळा

प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांच्या स्मृतिशताब्दीचा नुकताच समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.

स्वातंत्र्यावर मर्यादा हवी

लोकांनी आपल्या प्रतिनिधींना सभागृहामध्ये उपस्थित राहून काम करण्यासाठी निवडून दिलेले असते. सातत्याने सभात्याग करणे म्हणजे लोकांच्या मतांचा अनादर आणि त्यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. भलेही सरकारने मांडलेले मुद्दे पटत नसले, तरी त्यासाठी सभागृहातून बाहेर पडायलाच हवे असे नाही. किंबहुना लोकप्रतिनिधींनी सभागृहात उपस्थित राहणेच अत्यावश्यक आहे. ते सभागृहातील नियोजित कामकाजाच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वेळ सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर ती त्यांची अनुपस्थिती समजून खासदारकीच रद्द करण्याची तरतूद केली गेली पाहिजे.

सायबर संस्कारांना प्रारंभ

आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे.

आकाशवाणीचा संकोच

आकाशवाणी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राज्यसभेचे सदस्य असले तरी कोकणाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकेंद्रीकरणाकरिता लक्ष घालणे अपेक्षित आहे. वेळीच धोरणात्मक सुधारणा झाली नाही तर रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्राला वर्धापन दिनाऐवजी स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ येऊ शकेल.

मोबाइल व्यसनमुक्तीची गरज

मुलांचा जास्त वेळ मोबाइलवर जात असल्यामुळे डोळ्यांच्या आणि इतर शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत, तो भाग वेगळा. पण अभ्यासाच्या नावाखाली अभ्यासाचा मोजका वेळ वगळता मुले आभासी जगात जास्त रममाण होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षातील जगण्याकडे त्यांनी पाठ फिरविली आहे. क्रीडांगणाकडे तर मुलांनी साफ दुर्लक्ष केले आहे, पण क्रीडांगणाची गरज नसलेल्या इतर शारीरिक कसरतीही मुले टाळू लागली आहेत.