आकाशवाणीचा संकोच

आकाशवाणी हे भारतातील सर्वांत मोठे शासकीय नियंत्रण असलेले प्रसारण माध्यम आहे. पंचाण्णव वर्षांपूर्वी 1927 साली सुरू झालेल्या आकाशवाणीचा वर्धापनदिन २३ जुलै रोजी साजरा होत आहे. देशभरात आकाशवाणीची चारशेपेक्षा अधिक केंद्रे असून ९२ टक्के भौगोलिक क्षेत्र व्यापणारे आकाशवाणीचे जाळे एकूण लोकसंख्येच्या ९९ टक्क्यांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे. देशभरातील प्रमुख २३ भाषा आणि १४६ बोलीभाषांमधील कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर केले जातात. देशभरात सर्व राज्यांमध्ये मिळून ४४ वृत्तविभाग आहेत. त्यामधून स्थानिक भाषांमधील बातम्यांचे प्रसारण केले जाते. महाराष्ट्रात आकाशवाणीची २२ केंद्रे आहेत. त्यापैकी मुंबई आणि पुणे ही प्रमुख आहेत. अधिकाधिक विकेंद्रीकरण व्हावे, स्थानिक बोलीभाषा, संस्कृतीला वाव मिळावा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलांचा प्रसार व्हावा, हा आकाशवाणीचा मूळ उद्देश आहे. मात्र वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर विचार केला असता तो उद्देश लोप पावल्याचे जाणवत आहे. दिवसेंदिवस आकाशवाणीचे केंद्रीकरण सुरू आहे.

देशातील प्रत्येक जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र असावे, अशी कल्पना कोणे एके काळी होती. त्यातून ठिकठिकाणी केंद्रे सुरू झाली. रत्नागिरीचे केंद्र १९७६ साली सुरू झाले. ते लवकरच सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. सध्या ज्या वेगाने स्थानिक कार्यक्रमांचा संकोच होत आहे, ते लक्षात घेता रत्नागिरी केंद्राच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम कदाचित आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून साजरा होण्याची शक्यता आहे. एक काळ असा होता की स्थानिक तसेच प्रादेशिक आणि देशभरातील विविध बातम्या ताजेपणाने समजण्याचे आकाशवाणी हे एकमेव माध्यम होते. वर्तमानपत्रांचा प्रसार झाला नव्हता. आकाशवाणीच्या कार्यक्रमांना साक्षरतेचे, वयाचे बंधन नसते. फक्त ऐकू येणे एवढ्याच एका क्षमतेची गरज आकाशवाणीला असते. पण आता त्या प्रसारमाध्यमाकडे असलेला लोकांचा ओढा कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी केंद्रावर सध्या दिवसभरात सुमारे सोळा तासांचे प्रसारण केले जाते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्यातील सुमारे ४० टक्के वेळ प्रादेशिक किंवा देशपातळीवरील प्रसारणासाठी दिला जात असे. बाकीच्या ६० टक्के वेळेत स्थानिक कार्यक्रम प्रसारित होत असत. त्यामध्ये श्रुतिका, मुलाखती, सांगीतिक कार्यक्रम, मुलांचे, महिलांचे कार्यक्रम, शासकीय योजनांची माहिती देणारे तसेच कृषीविषयक कार्यक्रम अंतर्भूत होते. आता मात्र या साऱ्याच कार्यक्रमावर फुली मारली गेली आहे. प्रादेशिक आणि देशपातळीवरील कार्यक्रमांचे सहक्षेपण रत्नागिरी केंद्रावरून केले जात आहे. कमी-अधिक प्रमाणात राज्यातील प्रमुख चार केंद्रांचा अपवाद वगळला तर इतर सर्व केंद्रांची स्थिती हीच असावी. याचाच अर्थ स्थानिक कार्यक्रमांचा संकोच झाला आहे. दूरदर्शनच्या असंख्य वाहिन्या आणि खासगी एफएम केंद्रांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे माहिती आणि मनोरंजनाचे अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. पण निकोप, निर्भेळ, स्वच्छ कार्यक्रम तेथे प्रसारित होत नाहीत. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रसारही त्यावरून होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीचे वेगळेपण आणि महत्त्व वादातीत आहे. आता मात्र स्थानिक कार्यक्रम कायमचे बंद होण्याची शक्यता दिसत आहे.

आकाशवाणी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राज्यसभेचे सदस्य असले तरी कोकणाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकेंद्रीकरणाकरिता लक्ष घालणे अपेक्षित आहे. वेळीच धोरणात्मक सुधारणा झाली नाही तर रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्राला वर्धापन दिनाऐवजी स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ येऊ शकेल. देशाचा अमृतमहोत्सव साजरा करताना अशी वेळ रत्नागिरीच नव्हे, तर कोणत्याच स्थानिक आकाशवाणी केंद्रावर येऊ नये, हीच शतकोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आकाशवाणी दिनानिमित्ताने अपेक्षा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २२ जुलै २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply