बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : गेली नऊ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती, विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या दहाव्या वर्षानिमित्ताने पाच विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. वैयक्तिक सन्मानपत्रे आणि चार हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन दांपत्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक दांपत्य दिव्यांग (उभयता मूकबधीर) आहे.

डॉ. कलवारी दांपत्य

हर्चे (ता. लांजा) येथे गेली ५० वर्षे दुर्गम आणि ग्रामीण भागात अपुऱ्या सुविधा असतानाही हजारो रुग्णांवर अल्प मोबदल्यात किंवा प्रसंगी मोफत वैद्यकीय उपचार करणारे डॉ. शंकर विठ्ठल कलवारी आणि डॉ. सौ. सद्बुद्धी शंकर कलवारी हे सन्मानित असे सर्वांत वृद्ध दांपत्य आहे. रीळ-केसपुरी (ता. रत्नागिरी) या ग्रामीण भागात राहून गेली १८ वर्षे भातपिकावर संशोधन, बीजोत्पादन, देशी गाईंचे संवर्धन करणारे मिलिंद दिनकर वैद्य आणि सौ. सुवर्णा मिलिंद वैद्य हे सर्वांत तरुण दांपत्य आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवा ट्रस्टचे तिसऱ्या क्रमांकाचे खोत म्हणून गेली २८ वर्षे आषाढ दशमी उत्सव, श्रावण संततधार, शिमगोत्सव तसेच कालभैरव मूर्ती वज्रलेप तसेच देवी जोगेश्वरी मंदिर नूतनीकरण, शिलान्यास आदी विविध धार्मिक कर्तव्ये पार पडणारे बोधामृत निळकंठ फाटक आणि सौ. शुभदा बोधामृत फाटक हे तिसरे दांपत्य आहे.

सिंधुदुर्गातील देऊळवाडी, वेतोरे (ता. वेंगुर्ले) येथील दिव्यांग (उभयता मूकबधीर) असे रूपाजी वसंत धुरी आणि सौ. रूपाली रुपाजी धुरी या दांपत्याने शेती करताना, खूप धडपड करून आपल्या पूजा या (२३ वर्षीय) मूकबधीर कन्येला पदवीपर्यंत शिक्षण दिले. जी. डी. आर्ट परीक्षेत पूजा धुरी राज्यात दिव्यांग गटात पहिली आली आहे. दांपत्य गौरव पुरस्काराने सन्मानित असे हे दिव्यांग दांपत्य आहे. कुंभार्लीवाडी, मळगाव (ता. सावंतवाडी) येथील गोसावी घराण्यात श्रावणात दीड दिवसांचा नागपंचमी उत्सव साजरा करण्याची २०० वर्षांपेक्षा जुनी प्रथा आहे. एकत्र कुटुंबात हा उत्सव सर्व गावकऱ्यांसोबत साजरा होतो. साप या शेतकऱ्यांच्या मित्रा बद्दलचे प्रेम, निसर्ग संगोपन आणि सामाजिक सलोखा या कार्याबद्दल गोसावी कुटुंबाचे प्रतिनिधी आणि गेली २२ वर्ष ही जबाबदारी सांभाळणारे धर्मनाथ शांताराम गोसावी आणि सौ. रेश्मा धर्मनाथ गोसावी हे बोडस पुरस्कार दिला जाणार असलेले पाचवे दांपत्य आहे.

या सर्व दांपत्यांना वैयक्तिक सन्मानपत्रे आणि चार हजार रुपये असा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यापैकी ४ दांपत्यांना पुरस्काराची रक्कम बँक माध्यमातून दिली जाणार आहे. सन्मानपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठवली जाणार आहेत. ग्रामदैवत भैरीचे मानकरी फाटक दांपत्याचा गौरव देवी भैरी जुगाई ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे आणि उपाध्यक्ष राजन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार सौ. आदिती पटवर्धन यांनी कळविले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply