गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची टिळक अभिवादन यात्रा उत्साहात

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन यात्रेतून मानवंदना देण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे त्यांच्या १६६व्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. करोनाचा कालावधी वगळता तगेली १६ वर्षे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीला महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणापासून टिळक जन्मस्थानापर्यंत अभिवादन यात्रा काढली जाते. यावर्षीच्या यात्रेला विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला.

यात्रा टिळक जन्मस्थानापर्यंत पोहोचल्यानंतर प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्कृत विभागातील आर्या मुळ्ये, श्वेता सावंत, गौरी सावंत, चिन्मयी सरपोतदार, सिद्धी ओगले, वरदा बोंडाळे, सायली ताडे, सिद्धी कोळेकर या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी भक्तियोग या गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण केले. जीजीपीएसच्या पल्लवी घाणेकर, धनश्री वैशंपायन, तीर्था पावसकर, नेहल नेरूरकर, वैष्णवी बाष्टे यांनी प्रतापसिंह चव्हाण यांनी रचलेले आणि विजय रानडे यांनी संगीतबद्ध केलेले ‘रत्नभूमी ही पावन सुंदर’ हे गीत सादर केले. ‘हम करे राष्ट्र आराधन’ आणि ‘जननी मेरी जन्मभूमी’ ही देशभक्तीपर गीतेही त्यांनी सदर केली. त्यांना पार्थ खालगावकर यांनी तबला तर विजय रानडे यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली. महेश सरदेसाई यांनी पारंपारिक वेशात लोकमान्यांना ओवाळणी केली.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला, लेखन आणि कृतीतून त्यांनी राजकीय, सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा पाया टिळकांनी रचला. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. यावेळी त्यांनी टिळकांचे गणितज्ञ, संशोधक, खगोलशास्त्रज्ञ, पत्रकार, राजकारणी, विचारवंत असे विविध पैलू उलगडून दाखवले. लोकमान्यांचे विचार आणि कार्याचा वारसा रत्नागिरी शिक्षण संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय निश्चितच पुढे नेईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमात र. ए. सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उद्योजक आनंद भिडे, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रबंधक रवींद्र केतकर, कार्यक्रम समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. डी. गनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. का प्रा. तेजश्री भावे यांनी ऋतुजा टेंभे-जोशी विरचित लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील कविता सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply