तरुणांनी स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श ठेवून काम करावे : मोहितकुमार गर्ग

रत्नागिरी : सामाजिक जीवनात काम करताना आपले देशाविषयीचे प्रेम जागृत असणे आवश्यक आहे. युवकांनी स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जीवनात कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.

मोहितकुमार गर्ग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वराज्य – एक आझाद भारत’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २३ जुलै रोजी केले होते. रत्नागिरीच्या नवनिर्माण महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गर्ग बोलत होते. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे प्रमुख अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आशा जगदाळे आणि श्री. गर्ग यांचे वडील बुद्धिराम गर्ग या वेळी उपस्थित होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ‘स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ यात बदल झाला आहे. तेव्हा स्वातंत्र्य मिळविणे हेच उद्दिष्ट होते. आता ते टिकवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करायला हवेत,’ असे श्री. हेगशेट्ये यांनी या वेळी सांगितले.

यावेळी ‘स्वराज्य – एक आझाद भारत’ हा सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम रत्नागिरीतल्या कलाकारांनी सादर केला. यात ओंकार बंडबे, कश्मिरा सावंत – माणगावकर , पंकज घाणेकर, संदीप कार्लेकर, शार्दूल मोरे यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. स्वप्नील धनावडे आणि कलाकारांनी ‘ही तुमची शेवटची पिढी तर नव्हे ना?’ हे लोकमान्यांवर आधारित नाटुकले सादर केले. शाहीर बोंबले यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर पोवाडा सादर केला. राष्ट्रीय पारितोषिक विजेता हर्ष नागवेकर याने ‘स्वातंत्र्यसैनिक आणि आजचा युवक’ याविषयी उपस्थितांसोबत संवाद साधला. धीरज साटविलकर या दिव्यांग कलाकाराने पायाने लोकमान्यांचे चित्र काढले. युवा चित्रकार निरंजन सागवेकर याने चंद्रशेखर आझाद यांचे चारकोलच्या साह्याने चित्र साकारले. गणेश राऊत, ओंकार पंडित, स्वप्नील धनावडे, किरण राठोड यांनी नाटुकले सादर केले. क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांचा जीवनपट सांगणारी चित्रफीत दाखविली गेली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मयेकर यांनी केले, तर नियोजन समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply