आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

आंबडवे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्ये या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर आणि वकील दयानंद कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

महाविद्यालयाच्या दशकपूर्तीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, पहिले व्याख्यान वकील दयानंद कांबळे यांचे आहे, असे सहायक प्राध्यापक अरुण ढंग यांनी सांगितले.

संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करताना वकील दयानंद कांबळे म्हणाले, “लोककल्याणकारी राज्याची निर्मिती हे शासनाचे कर्तव्य आहे. कलम ३८ अन्वये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे गरजेचे आहे. सामाजिक-आर्थिक-राजकीय न्यायावर आधारित समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकी-प्रेम राहील व समतेची भावना निर्माण होईल आणि आदर्श अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्याने प्रयत्नशील राहावे. कलम ३९ अन्वये स्त्री-पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा, समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीची मालकी व नियंत्रण सामूहिक हिताला उपकारक होईल असे असावे. संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे. स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग होणार नाही असे पाहावे. नागरिकांना आर्थिक गरजेपोटी वय व ताकद यांना न पेलणाऱ्या व्यवसायात शिरण्यास भाग पाडू नये. बालकांना मुक्त वातावरणात आपला विकास साधण्याची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली जावी. शोषणापासून तसेच नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण करावे.” अशा पद्धतीने त्यांनी कलम ३८ ते कलम ५१ पर्यंत प्रत्येक कलमावर तपशीलवार मार्गदर्शन केले.

डॉ. अंशुमन मगर म्हणाले, “आज देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना देशाची प्रगती आणि देशासमोर उभी असलेली आव्हाने यांचा विचार केला, तर आजही लोकमान्य टिळकांच्या चतु:सूत्रीची आठवण होत आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री लोकमान्य टिळकांनी सांगितली होती. स्वदेशीचे महत्त्व या महत्त्वपूर्ण विषयावर आज विचार होणे आवश्यक आहे. आज देशाची आर्थिक परिस्थिती पाहता रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. देशाची आयात कमी करून निर्यातीवर भर देण्याची गरज आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापरावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सहायक प्रा. सायली घाडगे यांनी केले. आभारप्रदर्शन सहायक प्रा. अनिता पाटील यांनी केले. या वेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply