खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे…; उर्दू शाळेतल्या प्रार्थनेने भारावले हवालदार

आचरे : सध्याच्या काळात प्रत्येक घटनेकडे वेगळ्या चष्म्यातून पाहण्याचे, धार्मिक रंग देण्याचे प्रकार अनेकदा घडतात. जात आणि भाषेच्या आधारावरूनही समाजात भिंती निर्माण होत असल्याचं दुर्दैवी चित्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनेक ठिकाणी जाणवतं. त्यातून गैरसमज होण्याचे आणि तेढ वाढण्याचे प्रसंगही घडतात. मुख्य म्हणजे सोशल मीडियामुळे हे वेगाने पसरत असल्याने त्याला आणखी खतपाणी मिळतं आणि काही वेळा क्षुल्लक गोष्टीही खूप मोठ्या स्वरूपात पुढे आल्यामुळे गैरसमज शतपटींनी वाढतात. त्यामुळे ‘हम सब भारतीय है’ या एकीच्या भावनेला धक्का पोहोचतो; मात्र समाजात खूप चांगले प्रसंगही घडत असतात, गरज असते ती फक्त संवेदनशीलतेने त्यांच्याकडे पाहण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची आणि या चांगल्या प्रसंगांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची. आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) इथे नुकताच असा एक छोटासाच, पण चांगला, वेगळा प्रसंग घडला. त्याची ही बातमी…

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे आचरे आणि मालवण परिसरातल्या शाळा-शाळांमध्ये दर शनिवारी कथामालेचा उपक्रम चालतो. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजींनी लिहिलेली प्रार्थना त्यात मुलांकडून एकसुरात आणि तल्लीनतेने म्हटली जाते. कथाकथनही केलं जातं. आचरे डोंगरेवाडी, आचरे पारवाडी, आचरे बाग जामडूल, चिंदर, पडेकाप, मसुरे परिसर, मालवण, दांडी आदी शाळांचा या उपक्रमात सहभाग असतो. आचऱ्यातली उर्दू शाळाही त्याला अपवाद नाही.

इतर शाळांप्रमाणेच उर्दू शाळेतली मुलंही ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना म्हणतात. शनिवारी (२३ जुलै) त्या प्रार्थनेचा व्हिडिओ शाळेतल्या शिक्षिका अस्मा मॅडम आणि शिक्षक सय्यद मुश्ताक सर यांनी कथामालेच्या मालवण शाखेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केला. आपलं माध्यम उर्दू असूनही ती मुले मराठीतली ही प्रार्थना अत्यंत निरागसपणे आणि मनापासून म्हणत होती. त्यामुळे मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांना तो व्हिडिओ भावला. त्यांनी तो अन्य ग्रुप्सवर शेअर केला. तो व्हिडिओ पोलीस हवालदार तुकाराम पडवळ यांच्या पाहण्यात आला आणि ते एकदम भारावून गेले.

सुरेश ठाकूर म्हणाले, ‘उर्दू शाळेतल्या मुलांनी सादर केलेली ही प्रार्थना ऐकल्यानंतर हवालदार पडवळ यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी लगेच मला फोन केला. ते म्हणाले, ‘माझ्या गावच्या उर्दू शाळेतली मुलं ‘खरा तो एकचि धर्म’ ही साने गुरुजींची प्रार्थना किती छान, मनापासून म्हणतात! मी त्यांना ५०० रुपये बक्षीस देऊ इच्छितो. त्यांच्या सादरीकरणापुढे माझं हे बक्षीस फार विशेष नाही; पण माझ्या भावना त्या शाळेतल्या मुलांना समजू द्या.’ पोलीस हवालदारांचे हे शब्द ऐकून मीही भारावलो. साने गुरुजींच्या शब्दांची ही ताकद आहे.’

तसं पाहायला गेलं, तर हा प्रसंग खूप मोठा आहे असं नाही; पण आजच्या काळात सर्व प्रकारच्या अस्मिता टोकदार झाल्यामुळे द्वेषाची उदाहरणं अनेक ठिकाणी दिसत असताना संवेदनशीलता जागृत असेल, तर जगाला प्रेम अर्पण करण्याच्या धर्माचा विसर पडणार नाही, याची जाणीव यातून होते, एवढं मात्र नक्की.

(व्हिडिओ सोबत देत आहोत.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply