आदिवासी कुटुंबात जन्म, शिक्षिका ते राष्ट्रपतिपद – द्रौपदी मुर्मू यांचा प्रेरक प्रवास

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच (२५ जुलै २०२२) शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना शपथ दिली. मुर्मू यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा हा अल्प परिचय…

२२ जुलै २०२२ रोजी झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ६४.०३ टक्के मते मिळवून द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या. त्यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला.

द्रौपदी मुर्मू भारताच्या

  • पंधराव्या राष्ट्रपती आहेत.
  • दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
  • पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.
  • सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
  • ओडिशा राज्यातून येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
  • स्वातंत्र्योत्तर भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. (याआधीच्या सर्व राष्ट्रपतींचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला होता. (नरेंद्र मोदीसुद्धा स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत.)

द्रौपदी मुर्मू भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा होत्या. यावर्षीच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली आणि विजयी झाल्या.

राष्ट्रपतिपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. याआधी कधीही भारताच्या राष्ट्रपतिपदी अनुसूचित जमातीची (ST) स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेला नाही.

मात्र यापूर्वी दलित अर्थात अनुसूचित जातीचे दोन राष्ट्रपती झालेले आहेत — के. आर. नारायणन आणि रामनाथ कोविंद.

वैयक्तिक जीवन

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही गावचे सरपंच होते. ऊपरबेडा गावाच्या मध्यभागी असलेल्या माध्यमिक शाळेत द्रौपदी मुर्मू यांनी शालेय शिक्षण घेतले, तर भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बीए केले.

द्रौपदी मुर्मू यांना सहावी-सातवीत शिकवणारे शिक्षक विश्वेश्वर महंतो (वय ८२ वर्षे) सांगतात की, द्रौपदी लहानपणापासूनच हुशार होत्या आणि फावल्या वेळेत महापुरुषांची चरित्रे वाचायच्या.

श्यामचरण मुर्मू यांच्याशी १९७६ साली त्यांचा विवाह झाला. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. तथापि, त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मण मुर्मू याचे २००९ मध्ये, तर लहान मुलगा सिप्पुन मुर्मू याचे २०१३ मध्ये निधन झाले.
त्यानंतर पुढच्याच वर्षी २०१४ मध्ये त्यांचे पती श्यामचरण मुर्मू यांचेही निधन झाले. अशा दुर्दैवी घटना त्यांच्या आयुष्यात एकानंतर एक घडल्या. आता त्यांच्या कुटुंबात मुलगी, नातू आणि जावई आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या तीन महापुरुषांना त्या आपला आदर्श मानतात.

राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू शिक्षिका होत्या. नंतर त्या १९९७ मध्ये रायरंगपूरनगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आल्या. द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री असून २००० ते २००४ तसेच २००४ ते २००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री होत्या.

त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून नीलकंठ पुरस्काराने केले आहे.

मुर्मू यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या काळात झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ १८ मे २०१५ ते १२ जुलै २०२१ पर्यंत होता. एखाद्या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्यादेखील होत्या.

द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या. यापूर्वी प्रतिभा देवीसिंह पाटील भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती होत्या.

राष्ट्रपतिपदाचा शपथविधी झाला त्या दिवशी त्यांचे वय ६४ वर्षे ३५ दिवस आहे. त्या देशाच्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती बनल्या. आतापर्यंत सर्वांत कमी वयाचे राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे, २ महिने, ६ दिवस होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply