स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साडेसात हजार वाचक सभासदांचे उद्दिष्ट

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना द्विशताब्दी नजीक आलेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वाचक संख्या साडेसात हजारापर्यंत वाढवण्याचा संकल्प अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सोडला आहे.

ते म्हणाले, द्विशताब्दीच्या जवळ आलेली रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय ही रत्नागिरीतील एकमेव संस्था असावी. अनेक आव्हाने, नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करत १८२८ पासून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे वेगवेगळ्या नावाने ग्रंथसंपदा जोपासण्याचे काम करत आहे. रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र म्हणून आपली ओळख वाचनालयांने निर्माण केली आहे.

रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा उन्नत ठेवण्याचे काम वाचनालयाने सातत्याने केले. रत्नागिरीतील अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्वांनी आपापल्या कारकिर्दीत रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालायला अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. विविध ग्रंथसंपदेने समृद्ध असलेले हे वाचनालय आहे. वाचकाची वाचनतृष्णा भागवण्यासाठी ओतप्रत भरलेले हे वाचनालय अधिकाधिक वाचकांना सामावून घेण्यासाठी उत्सुक आहे. युवा पिढी, बाल वाचक, मध्यमवयीन, वृद्ध अशा सर्व वर्गातील स्त्री, पुरुष वाचकांना वाचनालयाचे वाचक सभासद होण्यासाठी वाचनालयाच्या व्यवस्थापक मंडळाने वाचक संख्या ७५०० पर्यंत वाढवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापासून करण्यात येणार आहे.

वाचनालयाचे वाचक सभासदत्व अगदी सोप्या पद्धतीने प्राप्त करता येते. विहित अर्ज, एक ओळखपत्र, २०० रुपये अनामत, १०० रुपये प्रवेशशुल्क आणि ५० रुपये मासिक वर्गणी जमा करून केवळ १५ मिनिटांत वाचनालयाचे वाचक सभासद होता येईल. मासिक वर्गणीत २ पुस्तके एका वेळी वाचकाला मिळतील. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, रत्नागिरीतील सर्व व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, विविध संस्थांचे सभासद, गृहनिर्माण संस्थांचे सभासद, निवृत्तीधारक, त्यांच्या संस्था, विविध कला, सांस्कृतिक, सामाजिक विषयांशी निगडित संस्था, ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, बागायतदार या सर्वांशी संपर्क साधला जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वांत जुने मात्र अद्ययावत वाचनालय सर्वांना वाचक सभासद होण्यासाठी साद घालत आहे. नव्या जुन्या प्रत्येक विषयावर आधारित उपलब्ध पुस्तक असलेले हे वाचनालय उत्कृष्ट दर्दी वाचकांच्या अव्याहत आगमनाची नेहमीच वाट पाहत असते.‌ सर्व नव्या जुन्या वाचकांनी वाचक सभासद व्हावे असे आवाहन जिल्हा नगर वाचनालायचे अध्यक्ष श्री. पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply