मोबाइल व्यसनमुक्तीची गरज

जग व्यापून टाकणाऱ्या करोना महामारीने जगभरात उद्योग-व्यवसायांवर परिणाम झालाच, पण माणसाचे दैनंदिन जीवन बदलून गेले. या काळात माणुसकीच्या कथा जन्माला आल्या, त्याच पद्धतीने माणुसकीशून्य व्यवहारांचे दर्शनही अनेक ठिकाणी घडले. दीड-दोन वर्षे घरातच राहिल्याचे अनेक दुष्परिणाम हळुहळू समोर येऊ लागले आहेत. कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या आभासी जगापासून दूर असलेले सर्व वयोगटातील लोक सोशल मीडियाच्या अधीन झाले. अनेक व्यवहार समाजातल्या सर्व स्तरातील लोक सहजगत्या करू लागले. त्यातून अनेक कामे मार्गी लागली. या काळात माणूस माणसाच्या जसा जवळ आला, तसाच एकमेकांपासून दूर गेला. आत्मकेंद्रित झाला. मी आणि माझे ही वृत्ती मोठ्या प्रमाणावर बळावली. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांकरिता अजूनही लोक एकत्र येत नाहीत. अनेक सामाजिक संस्था, संघटना आपापल्या परीने दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न आहेत. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात घ्यावे, वैचारिक देवाणघेवाण व्हावी, यासाठी काम करत आहेत. पण त्यांना अजूनही यश आलेले नाही. करोनाचे संकट दूर झाले असले, तरी माणसे एकत्र येण्याची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही.

या काळात आभासी दुनियेला खूप महत्त्व प्राप्त झाले. समाजाच्या सर्व घटकांवर जसा परिणाम झाला, तसाच तो शालेय विद्यार्थ्यांवरही झाला. सुरुवातीचे काही महिने अभ्यासाविना मनोरंजनात गेले. पण नंतर ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. शाळांमधूनच ऑनलाइन शिकवण्या सुरू झाल्या. प्रश्नपत्रिकांची देवाणघेवाण होऊ लागली. त्याच ठिकाणी पेपर तपासले जाऊ लागले. या सार्‍या प्रक्रियेमुळे मुलांच्या हाती मोबाइल आला. ते त्यांच्या हातचे खेळणे बनले. कोणतेही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सहजप्रवृत्ती नव्या पिढीकडे असते. त्याची मोठ्या माणसांना अपूर्वाई वाटते. त्यामुळे आपल्यापेक्षा लहान मुलांना मोबाइलमधले बरेच काही कळते, हे कौतुकाने सांगितले जाऊ लागले. परिणामी मुलांचा अधिकाधिक वेळ मोबाइल हाताळण्यात जाऊ लागला. आता मात्र ती एक मोठीच समस्या होऊन बसली आहे.

मुलांचा जास्त वेळ मोबाइलवर जात असल्यामुळे डोळ्यांच्या आणि इतर शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत, तो भाग वेगळा. पण अभ्यासाच्या नावाखाली अभ्यासाचा मोजका वेळ वगळता मुले आभासी जगात जास्त रममाण होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षातील जगण्याकडे त्यांनी पाठ फिरविली आहे. क्रीडांगणाकडे तर मुलांनी साफ दुर्लक्ष केले आहे, पण क्रीडांगणाची गरज नसलेल्या इतर शारीरिक कसरतीही मुले टाळू लागली आहेत. त्याचे मानसिकदृष्ट्या त्यांच्यावर मोठे दुष्परिणाम होऊ लागले आहेत. अयोग्य आणि मुलांनी न पाहण्यासारख्या अनेक गोष्टी त्यांना मोबाइलवर दिसू लागल्यामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही समस्या लक्षात घेऊन राजापूर तालुक्यातील जानशी येथील शाळेतील मुलांच्या पालकांनी संघटित होऊन मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याची विनंती शिक्षकांना केली आहे. मुले आई-वडिलांपेक्षा शिक्षकांचे ऐकतात, हे खरे आहे. एखादी गोष्ट घरात आई-वडील आणि आजी-आजोबांनी सांगितली, तर ती त्यांना पटत नाही. पण तेच शिक्षकांनी सांगितले तर मुलांकडून त्याचे अनुकरण होते. हेच लक्षात घेऊन शिक्षकांनीच आता मुलांना मोबाइलपासून परावृत्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे. मुलांना लागलेले मोबाइलचे व्यसन दूर झाले पाहिजे, याची जाणीव त्या पालकांना झाली आहे. सर्वच पालकांना ती होण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनीही प्रत्यक्ष अभ्यासावरच लक्ष दिले पाहिजे. मोबाइलवरून गृहपाठ पाठविणे पूर्णपणे बंद केले पाहिजे किंबहुना मोबाइलचा वापर केला तर त्यासाठी शिक्षा करण्याचीसुद्धा वेळ आली आहे. शिक्षकांनी आणि पालकांनी हे वेळीच लक्षात घेतले नाही, तर मोबाइल मुलांचे भविष्यच बिघडवून टाकणार आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १५ जुलै २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply