परशुराम घाटातून आता दिवसा अवजड वाहनांची एकेरी वाहतूक; रात्री घाट पूर्ण बंद

रत्नागिरी : दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू ठेवण्याचे आणि रात्री घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (१४ जुलै) जारी केले आहेत. हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

चौपदरीकरणासाठी ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने चिपळूणजवळील परशुराम घाट धोकादायक बनला आहे. तेथे दरडी कोसळण्याचा धोका असल्याने घाटातील वाहतूक गेले काही दिवस बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर पेण आणि रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस आणि परिवहन विभागाने घाटाची पाहणी केली. घाटातील वाहतूक सुरक्षित करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली. सुरक्षाविषयक विविध कार्यालयांच्या सूचनेनुसार आजपासून (१४ जुलै) पुढील आदेश मिळेपर्यंत दररोज सकाळी ६ ते ते सायंकाळी ७ या वेळेत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सायंकाळी ७ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

खेडकडून चिपळूणकडे एक तास आणि चिपळूणकडून खेडकडे एक तास अशी आळीपाळीने वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे.

वाहतूक सुरू असताना दोन अवजड वाहनांमध्ये किमान ५० ते १०० मीटर इतके अंतर असावे. वाहनांचा वेग ताशी २० ते ३० किलोमीटर असावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी घाटात २४ तास गस्त आणि बचावकार्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घाटातील वाहतूक कोणत्या वेळी खुली किंवा बंद राहणार आहे, याबाबत घाटाच्या सुरुवातीस आणि घाटाच्या शेवटी तशा सूचना ठळकपणे लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच त्याबाबत पनवेल, सिंधुदुर्ग, गोवा आणि व कोल्हापूर येथेही व्यापक प्रसिद्धी देण्याची सूचना करण्यात आली आहे. परशुराम घाटातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबईहून येणारी जास्तीत जास्त वाहने, पनवेलहून मुंबई-पुणे महामार्गावरून तसेच गोव्यावरून येणारी वाहने पाली (जि. रत्नागिरी) येथून रत्नागिरी-कोल्हापूर-पुणे या मार्गे वळविण्यात येतील.

चिपळूणकडून खेडकडे येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी कळंबस्ते-आंबडस-शेल्डी-आवाशी हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
खेडकडून चिपळूणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पीरलोटे-चिरणी-आंबडस फाटा-कळंबस्ते फाटा हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

(सोबतच्या चित्रात दर्शवलेला पर्यायी मार्ग आता हलक्या वाहनांना खेडकडून चिपळूणकडे जाण्यासाठी एकेरी वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आला आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply