समाजातल्या तळागाळातल्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या व्यथा लेखनात मांडून समाजव्यवस्थेविरुद्ध कायम आसूड ओढणारे तळमळीचे कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक माधव गुणाजी कोंडविलकर यांचं ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे पुस्तक आता ‘स्टोरीटेल’ने ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध केलं आहे. त्यांच्या रोजनिशीवर आधारित असलेलं हे पुस्तक लोकप्रिय आहे. नुकताच १५ जुलै रोजी कोंडविलकर यांचा जन्मदिन झाला. त्याचं औचित्य साधून ‘स्टोरीटेल’ने हे ऑडिओ बुक प्रकाशित केलं. प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी आपल्या उत्तम आवाजात अतिशय प्रभावीपणे या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे.
‘स्टोरीटेल मराठी’चे पब्लिशिंग मॅनेजर प्रसाद मिरासदार म्हणाले, ‘या पुस्तकातून समाजातल्या अन्याय्य जातिव्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याचं धाडस कोंडविलकर यांनी केलं आहे. कोकणातल्या ग्रामीण राजापुरी शैलीतले संवाद मंगेश सातपुते यांच्या आवाजात ऐकताना दैनंदिनी स्वरूपातली ही वास्तववादी कादंबरी श्रोत्यांच्या थेट काळजाला भिडते! स्टोरीटेलतर्फे लवकरच माधव कोंडविलकर यांच्या आणखी दोन कादंबऱ्या ऑडिओ बुक स्वरूपात प्रकाशित केल्या जाणार आहेत.’
‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ला १९८४ साली महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला होता. या पुस्तकावर संशोधनपर प्रबंध (पीएचडी) झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये हे पुस्तक अभ्यासाला आहे. त्यावरून नाटकही लिहिण्यात आलं होतं. या पुस्तकाचा हिंदी व फ्रेंच अनुवादही झाला होता.
‘वाचकांनी हे ऑडिओ बुक ऐकावं आणि आपले अभिप्राय ‘माधव कोंडविलकर’ या फेसबुक पेजवर कळवावेत,’ असे आवाहन कोंडविलकर यांची कन्या डॉ. ग्लोरिया अमोल खामकर यांनी केलं आहे.
‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ ही कादंबरी प्रथम १९७७ साली तन्मय दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९७९ साली पत्नी सौ. उषा कोंडविलकर यांनी कन्या ग्लोरियाच्या नावाने ती स्वतंत्रपणे प्रकाशित केली. या कादंबरीची १९८७ साली दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.

‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या पुस्तकाचं अनेक मान्यवर साहित्यिकांनी कौतुक केलं होतं. ‘हे पुस्तक वाचून आपण पुन्हा एकदा अमानुषांच्या जगात जगत असल्याचा अनुभव आला. ह्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या शक्तीदेखील जशा एकवटाव्यात तशा एकवटत नाहीत. त्यातही फाटाफूट, ही परिस्थिती मनाला अधिक निराश करणारी आहे,’ असा अभिप्राय पु. ल. देशपांडे यांनी दिला होता. गो. नी. दांडेकर यांनी ‘हा फार मोठ्या ताकदीचा लेखक आहे,’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. तसंच, नामदेव ढसाळ यांनी तर ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ म्हणजे एक महाकाव्यच असल्याचं म्हटलं होतं. ‘माधवराव, आम्ही शाईनं लिहितो. मात्र तुम्ही रक्तानं लिहिता,’ असे उद्गार बाबा कदम यांनी काढले होते. ‘माधवराव, आता ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ माझ्या मनासारखं झालं आहे,’ असं मधू मंगेश कर्णिक यांनी म्हटलं होतं.
माधव कोंडविलकर यांचा जन्म १५ जुलै १९४१ रोजी झाला, तर १२ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचं निधन झालं. अजून उजाडायचे आहे, अनाथ, छेद, वेध, झपाटलेला, कळा त्या काळच्या, डाळं, देशोधडी, हाताची घडी तोंडावर बोट, आता उजाडेल, एक होती कातळवाडी इत्यादी कादंबऱ्या माधव कोंडविलकर यांनी लिहिल्या. निर्मळ, काहिली हे कथासंग्रह, मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे नाटक, देवदासी, कोंगवन हे शोधग्रंथ, इटुकले राव, छान छान गोष्टी हे बालसाहित्य, देवांचा प्रिय राजा सम्राट अशोक हे चरित्र लिहिले, तर स्वगत व स्वागत या पुस्तकाचे संपादन केले. एक तळमळीचा कार्यकर्ता लेखक अशी त्यांची ओळख होती.
……..
‘कादंबरीकार माधव कोंडविलकर’ या नावाचा ग्रंथ डॉ. रावसाहेब दशरथ ननावरे यांनी लिहिला आहे. त्यात त्यांच्या कादंबऱ्यांची समीक्षा करण्यात आली आहे. त्या कादंबरीतील माधव कोंडविलकर यांचा अल्प परिचय आणि त्यांच्या साहित्याविषयी मान्यवरांची मते सोबत देत आहोत.
…………
माधव कोंडविलकर यांचा जन्म कोकणातील एका आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या खेड्यामध्ये झालेला आहे. आधुनिक व पुरोगामी विचारसरणीचा स्पर्श या खेड्याला झालेला नव्हता. अशा अंधःकारमय पार्श्वभूमी लाभलेल्या खेड्यात माधव कोंडविलकरांचे बालपण गेले. गावात अस्पृश्यता पाळली जात असल्यामुळे आणि अस्पृश्य समाजात जन्माला आलेले असल्यामुळे लाचारीचे जीवन कोंडविलकर कुटुंबीयांच्या वाट्याला आलेले होते. शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या खेड्यामध्ये माधव कोंडविलकरांची घुसमट होत होती. चातुर्वर्ण्य व्यवस्थेखाली दबल्या गेलेल्या बेबंद व दहशतीच्या वातावरणातून माधव कोंडविलकरांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत गेली. प्राथमिक शिक्षण म्हणून सेवाही कोकणातील अशाच खेड्यामधून झालेली होती. या जीवनानुभवामुळेच माधव कोंडविलकरांच्या साहित्यलेखनाला स्वानुभवाची धार असल्यामुळे त्यांच्या साहित्यनिर्मितीत दलित व दरिद्री जीबनाची दाहकता व्यक्त होते. कोकणातील लोकांचे विविध प्रश्नव आणि समस्या कोंडविलकरांच्या वाङ्मयातून जिवंत झाल्याशिवाय राहत नाही. कोंडविलकरांच्या मांडणीतील जिवंतपणामध्ये त्यांच्या जीवनसंदर्भाचा वाटा अतिशय मोलाचा आहे. माधव कोंडविलकर यांचे जीवन आणि वाङ्मय यांचा जवळचा संबंध आहे.
माधव कोंडविलकर यांचे मूळ गाव ‘कोंडिवली’ हे असून, ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याडत वसलेले आहे. माधव कोंडविलकरांचे पूर्वज त्या गावातील प्रमुख बलुतेदार होते. निजामशाहीपूर्वीच्या काळात बलुतेदारीच्या निमित्ताने कोंडिवलीहून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ‘पडवे’ या गावात कोंडविलकरांच्या पूर्वजांचे पहिले स्थलांतर झाले. माधव कोंडविलकरांच्या अनेक पिढ्या पडवे या गावात नांदलेल्या होत्या. सोगमवाडी (ता. राजापूर) या गावातील कुणब्यांनी ‘पडवे’ गावातून माधव कोंडविलकरांचे पणजोबा रामजी यांना आपल्या गावात स्वतंत्र चर्मकार असावा म्हणून गावात येण्याचे आमंत्रण दिले. सोगमवाडीत घर बांधायला रामजींना जमीन दिली. रामजींनी आपल्या चार मुलांपैकी तीन मुले पडवे गावात ठेवून माधव कोंडविलकर यांचे आजोबा विश्राम या मुलाला सोगमवाडीत आणले. माधव कोंडविलकरांच्या पूर्वजांचे दुसरे स्थलांतर सोगमवाडी या गावात झाल्याचे दिसून येते.
सोगमवाडीत संपूर्ण अस्पृश्यता पाळली जात होती. माधव कोंडविलकरांच्या कुटुंबातील स्त्री-पुरुषांना, मुलांना सोगमवाडीत गावातील ब्राह्मण, वाणी, कुणबी, भंडारी, न्हावी, तेली, सोनार इत्यादी लोक स्पर्श करीत नसत. सोगमवाडीत चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे प्रकर्षाने पालन होत असे. सोगमवाडीत फक्त चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. पोस्ट, प्राथमिक शाळा, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय, रास्त दराचे धान्य दुकान, भार्गवराम (आर्यभट्ट परशुराम) यांचे देऊळ सोगमवाडीपासून सहा मैलांच्या अंतरावर होते. थोडक्यात फार काही नागरी सुविधा त्या गावात नव्हत्या.
माधव कोंडविलकरांचे आजोबा सोगमवाडीत आंबा, फणस, काजू इत्यादी फळझाडे असलेल्या ओढा व जैतापूरची खाडी असलेल्या रमणीय निसर्गात उभारलेल्या कोकणातील खेड्यातील झोपडीत राहत होते.
- डॉ. रावसाहेब दशरथ ननावरे (‘कादंबरीकार माधव कोंडविलकर’ या पुस्तकातून)
माधव कोंडविलकर हे दलित साहित्यातील आद्य चरित्रकार
डॉ. रावसाहेब कसबे
माधव कोंडविलकर हे दलित साहित्यातील आद्य आत्मचरित्रकार. त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या आत्मचरित्रानंतर दलित साहित्यिकात आत्मचरित्रांची लाटच आली. त्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले. आज दलित साहित्य जागतिक पातळीवरील साहित्यविश्वात अग्रभागी आहे, त्यामागे दलित साहित्यिकांची तपश्चर्या आणि त्यांचे व्यवस्थाबदलाचे स्वप्न आहे. कोंडविलकर यांनी अनेक साहित्यप्रकारांत सहज संचार केला.
कोंडविलकर यांच्या कादंबऱ्यांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. कोंडविलकरांच्या कादंबऱ्यांचा सगळ्यात लक्षणीय विशेष कोणता असेल, तर तो कोकण प्रदेश चित्रणाचा. कोकणचा प्रदेश या कादंबऱ्यांतून प्रभावीपणे व्यक्तस झाला आहे. स्वत: कोंडविलकर कोकणातील असल्यामुळे आणि कोकण त्यांच्या जीवनानुभवाचा आणि भावविश्वाचा भाग असल्याने कोकणचे चित्रण हे स्वाभाविकच म्हणायला हवे. कोकणातील दलित जीवन, तेथील निसर्ग, संस्कृती, गावपातळीवरील राजकारण, कोकणला जवळ असणाऱ्या मुंबईतील बकाल जीवन, कोकण आणि मुंबई यांचा अनुबंध कोंडविलकरांच्या साहित्यात सापडतो.
डॉ. मनोहर जाधव
(मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या कादंबरीविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

