रत्नागिरी : ‘रस्त्याला, चौकांना बहुतेक वेळा राजकीय पुढाऱ्यांची नावे दिली जातात, परंतु आज एका साहित्यिकाचे नाव या चौकाला दिले जात आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे,’ असे उद्गार कोकणातील प्रसिद्ध कवी महेश केळुसकर यांनी विद्याकुमार शेरे चौक या नामफलकाचे अनावरण प्रसंगी काढले.
प्रसिद्ध लेखक असलेल्या विद्याकुमार शेरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीतील शेरे नाक्याला त्यांचे नाव द्यावे, अशी विनंती त्यांचे सुपुत्र डॉ. शाश्वत शेरे यांनी रत्नागिरी नगर परिषदेला केली होती. त्याला मंजुरी दिली गेली व एक मार्च रोजी सकाळी या नामफलकाचे अनावरण महेश केळुसकर यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात डॉ. शाश्वत शेरे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या अमेरिकेत असलेल्या भगिनी सौ. ऋजुता पाथरे यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखविला. त्यांनी आपल्या वडिलांच्या एक प्रसिद्ध लेखक म्हणूनच नव्हे तर एक प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी आणि एक प्रेमळ पिता म्हणून असलेल्या आठवणी जागवल्या.
यानंतर झालेल्या कविसंमेलनात जयश्री बर्वे, स्वप्नजा मोहिते, अनघा निकम, गौरी सावंत, विजयानंद जोशी, डॉ. अमेय गोखले, शुभंम कदम व डॉ. शाश्वत शेरे यांनी आपल्या कविता सादर केल्या. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी दादा मडकईकर यांनी आपली मालवणी कविता सादर केली आणि सूत्रसंचालन करताना आपल्या कवितांसोबत अन्य प्रसिद्ध कवितांचा उल्लेख करून महेश केळुसकर यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.