‘महिलांना एक दिवस नव्हे, वर्षभर सन्मान मिळण्याची गरज’

रत्नागिरी : ‘महिला दिन केवळ आठ मार्चला नव्हे, तर वर्षाचे सर्व दिवस साजरा करायचा असतो. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असलो, तरी प्रत्यक्षात आपण त्याविरोधात वागतो. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. याचा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे,’ असे प्रतिपादन स्वयंसेतू संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरीतील दी यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, प्राचार्य डॉ. मीनाक्षी देवांगमठ, प्रा. चेतन अंबुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. कळंबटे यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. समानता म्हणजे काय, विवाहानंतर नातेसंबंधांमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यावर कशी मात करावी, समाजात आपले योगदान कसे असावे याबाबत कळंबटे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली व संवाद साधला.

‘तणावपूर्ण जीवन न जगता माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. प्रेमविवाहानंतर काही वर्षांत खटके उडून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. घर तोडू नका, तर जोडा,’ असा सल्ला श्रद्धा कळंबटे यांनी दिला.

या कार्यक्रमात सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. नंतर पूजा चव्हाण, प्रिया वाफिलकर, साहिल पडवेकर, बाळकृष्ण मर्तल, भावेश कवळकर या विद्यार्थ्यांनी महिला दिनाविषयी माहिती दिली. किरण सावंत, पूर्वा नारकर, सिद्धी शिरवडकर, बाळकृष्ण मर्तल यांनी महिला दिनाविषयी काढलेल्या पोस्टर्सचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. देवांगमठ, रजिस्ट्रार शलाका लाड, तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

वरील फोटो : दी यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये महिला दिन कार्यक्रमात श्रद्धा कळंबटे यांचा सत्कार करताना माधवी माने. सोबत डॉ. मीनाक्षी देवांगमठ आणि प्रा. चेतन अंबुपे.

Leave a Reply