मुग्धा गावकरांच्या गायनाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

रत्नागिरी : गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर यांनी सादर केलेल्या शास्त्रीय, तसेच अभंग, नाट्यगीत गायनाने रत्नागिरीकरांना मंत्रमुग्ध केले. रत्नागिरीतील ‘खल्वायन’ या संस्थेची सलग २६९वी मासिक संगीत सभा १४ मार्च २०२० रोजी सायंकाळी झाली. ती सभा मुग्धा गावकरांच्या सुमधुर गायनाने रंगली. कै. अरुअप्पा जोशी स्मृती मासिक संगीत सभा म्हणून झालेली ही सभा रत्नागिरीतील गोदूताई जांभेकर विद्यालयात झाली.

मुग्धा गावकर यांनी जोग रागातील पंडित संजीव अभ्यंकर यांनी बांधलेली विलंबित त्रितालात बद्ध असलेली ‘नाही परत चित चैन’ ही बंदीश बडा ख्यालात सादर करून मैफलीची सुरुवात केली. याला जोडून पंडित जसराज यांनी बांधलेली द्रुत त्रितालात बद्ध असलेली ‘तुम बिन कैसे कटे दिन रतियां’ ही बंदीश त्यांनी सादर केली. ‘दीर दीर तन तोम’ हा तराणाही त्यांनी पेश केला. सुरवातीला शांत, संयमी, स्वच्छ स्वरलगावाद्वारे त्यांनी मैफलीवर पकड मिळवली. त्यानंतर आलाप, ताना, सरगम याचा सुरेख मेळ साधत आपल्या आक्रमक, धारधार व तीनही सप्तकातील सहज स्वर लगावाद्वारे त्यांनी श्रोत्यांना स्वर्गीय सुरांची जणू मेजवानीच दिली. त्यानंतर त्यांनी ‘या पंढरीचे सुख हा’ अभंग, एक कोकणी गीत, शूरा मी वंदिले, घेई छंद मकरंद ही नाट्यपदे सादर केली. शेवटी ‘बाजे मुरलिया बाजे’ या प्रसिद्ध पदाने त्यांनी आपल्या मैफलीचा शेवट केला.

रत्नागिरीचे प्रसिद्ध वादक हेरंब जोगळेकर (तबला) आणि मधुसूदन लेले (हार्मोनियम) यांनी मैफलीला समर्थ साथसंगत केली. तानपुरासाथ सिद्धी शिंदे, तर तालवाद्य साथ प्रा. सुहास सोहनी यांनी केली.

कशेळी (राजापूर) येथील प्रसिद्ध गायक चिंतामणी सखाराम उर्फ बंडूकाका भागवत यांचे अलीकडेच निधन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘खल्वायन’ची आठ नोव्हेंबर १९९७ रोजी झालेली पहिली मासिक संगीत सभा त्यांनी रंगवली होती.

अरुण मुळ्ये यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्ज्वलनादी कार्यक्रम झाले. तेंडुलकर यांनी प्रास्ताविक करून कलाकारांची ओळख करून दिली. ५९व्या हौशी संगीत राज्य नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविलेल्या वरवडे (रत्नागिरी) येथील आश्रय सेवा संस्थेचा गौरवही या वेळी करण्यात आला. त्या संस्थेचे अध्यक्ष अरुण मुळ्ये यांना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ‘खल्वायन’चे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी कलाकारांना सन्मानपत्र, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.

मैफलीच्या यशस्वितेसाठी जांभेकर विद्यालय, संजू बर्वे, दिलीप केळकर, संगीता बापट, संध्या सुर्वे, किरण बापट (पनवेल) आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply