Representational

स्वच्छतेच्या संदेशाचा संसर्ग प्रत्येकाला व्हावा

करोना नावाच्या आजाराने सध्या जगभरात थैमान घातले आहे. देश आणि राज्य पातळीपासून या आजाराचा फैलाव आता जिल्हा आणि गावपातळीपर्यंत येऊन पोहोचला आहे. हे जगभरातले संकट आहे. ते का निर्माण झाले असू शकते, याबाबतचा सविस्तर लेख कोकण मीडियाच्या २० मार्च २०२० च्या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. अशा संसर्गजन्य आजारांच्या बाबतीत प्रामुख्याने काही उपाय सुचविले जातात. त्यामध्ये शुद्ध पाणी पिणे, स्वच्छ हात स्वच्छ धुणे, एकमेकांशी निकटचा संपर्क येणार नाही अशा पद्धतीने वागणे, प्रदूषण टाळण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे मास्क घालणे असे प्राथमिक उपाय सुचविले जातात.

जगभरातले सोडून द्या, पण आपल्या भागातला विचार केला, तर असा संसर्ग वाढायला सर्वाधिक अस्वच्छताच कारणीभूत आहे, याकडे अशा वेळी लक्ष जात नाही. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे संसर्गजन्य रोग उद्भवतात, हे खरे आहे. कारखाने आणि उद्योगांमुळे होणारे जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि सागरी प्रदूषण हे मोठे विषय आहेत. हे प्रदूषण टाळण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयोग आणि प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांवर पाणी फिरविण्याचे कामही त्याच वेगाने सुरू असते. हे सारे सार्वजनिक स्वरूपाचे आहे. खासगी आणि सरकारी उद्योग तसेच सरकारने हाताळायचे ते विषय आहेत. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने व्यक्ती म्हणून विचार केला, तरी आपला त्यात कितपत सहभागी असतो, आपल्यामुळे होणारे प्रदूषण आपल्यालाच रोखता येईल का, असा विचार सर्वसामान्य लोक कधी करणार आहेत, हा प्रश्न आहे.

व्यक्तिगत पातळीवर स्वच्छतेचे योग्य ते प्रयत्न झाले, तर सर्वसामान्य व्यक्ती प्रदूषणामुळे आणि त्यातून होणार्या् संसर्गामुळे वाचू शकतील. पण तसे होताना दिसत नाही. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर करोना या आजाराचा फैलाव झाल्यानंतर हात-तोंड धुणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छ पाणी पिणे अशा गोष्टी प्रत्येकाने कराव्यात, असे सांगितले जाते. वास्तविक या तर अत्यंत प्राथमिक गोष्टी आहेत. प्राथमिक शाळांमध्येच स्वच्छतेचे हे धडे दिले जातात. ते गिरवून घेतले जातात. त्यांचा नेहमीच विसर पडतो. नागरी जीवनात स्वच्छतेच्या स्पर्धाही होतात. त्यामध्ये लक्षावधी रुपयांचे पुरस्कार स्वच्छतेसाठी म्हणून दिले जातात. असे पुरस्कार मिळवून ‘स्वच्छ’ ठरलेली शहरे आणि गावे तरी किमान प्रदूषणापासून मुक्त राहायला हवीत! पण तसे होताना दिसत नाही. कारण असे पुरस्कार मिळविण्यासाठीच स्पर्धेमध्ये सहभाग घेतला जातो. प्रदूषणमुक्तीसाठी मिळणाऱ्या पुरस्कारांची रक्कम पुन्हा प्रदूषण करण्यासारख्या उपक्रमांवरच खर्च केली जाते. पुन्हा थोड्याच काळात येरे माझ्या मागल्या अशी स्थिती होते. व्यक्तीपासून समाजापर्यंत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत कोणालाच या प्रश्नाचे गांभीर्य नाही.

वास्तविक पुरस्कारविजेत्या ‘स्वच्छ’ शहरांमध्ये प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला, तर अशा संस्थांना पुरस्काराएवढ्याच मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्याची तरतूदही व्हायला हवी. तसे झाले, त्याचे गांभीर्य लक्षात येईल. स्थानिक स्वराज्य संस्था पुरेशी काळजी घेतील आणि नागरिकांनाही तशा सवयी लावतील. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शाळा-महाविद्यालयांपासून शासकीय कार्यालयापर्यंत सर्वांना अनिश्चित काळापर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी प्रत्येक पातळीवर स्वच्छतेसाठी वापरली गेली तर या सुट्टीचे सार्थक होईल. पण तेही होत नाही. या सुट्टीचा अधिक वेळ वेगवेगळ्या मनोरंजनासाठीच वापरला जाण्याची शक्यता आहे. एका विषाणूच्या प्रसारामुळे जगातील सारी अर्थव्यवस्था ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे आपण आपल्या पातळीवर विचार केला तरी अस्वच्छतेमुळे हा संसर्ग वाढतो आहे, एवढा विचार प्रत्येकाने केला तर निदान पुढचा एखादा संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी आपण सज्ज झालेले असू. स्वच्छतेच्या संदेशाचा संसर्ग प्रत्येकाला झाला, तरच ते शक्य होणार आहे.

  • प्रमोद कोनकर

    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २० मार्च २०२०)

    (या अंकाचे ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. हा अंक गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध असून, तेथून खरेदीसाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply