रत्नागिरी : करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी नागरी (शहरी) भागांसाठी आहे. रत्नागिरीसह खेड, चिपळूण आणि राजापूर, नगरपालिकांचे क्षेत्र, तसेच मंडणगड, दापोली, गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्येही जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता येईल; मात्र एका घरातील एकच व्यक्ती एका वेळी घराबाहेर पडू शकेल. या सर्व शहरांमध्ये दुचाकीवरूनही एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. दुचाकीवर दुसरी व्यक्ती दिसली, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला शिक्षा केली जाईल.
जमावबंदीच्या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही. त्यासाठीच जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंची विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणताही धार्मिक, सामाजिक जाहीर कार्यक्रम या कालावधीत करता येणार नाही. लग्न-मुंजीसह कोणताही कौटुंबिक कार्यक्रमही करता येणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
ग्रामीण भागामध्ये तूर्त तरी जमावबंदी नसली, तरी दुकाने आणि अन्य सर्व व्यवहार बंद ठेवायचे आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळला आहे, ते जिल्हे लॉकडाउन जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे जमावबंदीसाठी लागू असलेले सर्व नियम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहेत.
लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी

