करोना संसर्गाशी दोन हात करण्यासाठी राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता; मात्र तरीही लोक रस्त्यांवर येत असल्याने राज्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. २३ मार्च २०२० रोजी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांनी लाइव्ह प्रसारणात ही माहिती दिली. सगळ्या जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहेत. म्हणजेच कोणीही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे –
आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे, तसे थैमान होईल.
सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या; पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते.
काल राज्यात १४४ कलम लावले होते. आता मला राज्यात संचारबंदी लावावी लागते आहे.
खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठीच सुरू राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.
काल आपण इतर राज्यांच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमादेखील बंद करीत आहोत. या वाहतूकबंदीत खासगी वाहनेदेखील आली.
देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावेत, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे
जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न-धान्य, तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील. पशुखाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील.
खूपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे.
सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील
प्रसंगी आशा वर्कर्स, अंगणवाडी, होमगार्डस् यांनादेखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत.
सर्व माध्यमांनादेखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात.
ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनीदेखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत.
ही कठोर पावले केवळ जनतेच्या हितासाठी आहेत.
(माहिती स्रोत : मुख्यमंत्री सचिवालय, जनसंपर्क कक्ष)
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media