कलम १४४ : काय करावे, काय करू नये? रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

रत्नागिरी : ‘२२ मार्चच्या मध्यरात्रीपासून राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून कलम १४४ची प्रभावी अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

‘प्रशासनाकडून कोरोनाशी मुकाबला करताना अधिक खंबीर पावले टाकली जात आहेत. नागरिकांनी न घाबरता आपल्या दैनंदिन सवयी बदलणे गरजेचे आहे. आपणाला फक्त सार्वजनिक ठिकाणी गटाने फिरण्यास व बाहेर एकत्रित राहण्यास मज्जाव करण्यात येत आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. ही लढाई एका विषाणूशी आहे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे हाच सध्या उपाय असल्याने प्रशासनाला कलम १४४ लागू करण्याची वेळ आली आहे,’ असे जिल्हाधिकारी म्हणाले.

सूचनांचे पालन न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात यावर बंदी असेल :

  • सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी
  • रेल्वे, खासगी बसेस आणि एसटी बसेस बंद
  • खासगी प्रवासी वाहतूक बंद
  • सर्व प्रकारच्या प्रार्थनास्थळांमध्ये भाविकांना येण्यास बंदी; मात्र पूजा-अर्चा सुरू राहील
  • फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर
  • जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून बाकी सर्व बंद
  • जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदींच्या उपलब्धतेसाठी दुकाने व वाहतूक सुरूच
  • शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृहे, सार्वजनिक कार्यक्रम बंद

या सेवा राहतील सुरू :
शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व बँका व पोस्टल कार्यालये, दूरध्वनी व इंटरनेट सेवेशी संबंधित कार्यालये, जीवनावश्यक साहित्य पुरवठा करणारी दुकाने, वीज कार्यालये व पेट्रोल पंप, प्रसारमाध्यमांची कार्यालये, ई-कॉमर्स सेवा देणारे (उदा. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन इ.), अत्यावश्यक कामासाठी लागणारी वाहने.

अंत्यविधी (२५पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होऊ शकत नाहीत.)

जीवनावश्यक वस्तूंसाठीची दुकाने किंवा सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्यांचा साठा करून ठेवू नका. किराणा, भाजीपाला यासाठी वाहतूक सुरू राहणार आहे त्यामुळे कोणीही यासाठी बाहेर पडून अतिरिक्त साठा करण्यासाठी घाई करू नये. दुकानदारांनीही योग्य भावातच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरिकांना करायचा आहे.

लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

‘शक्यतो लोकांना विभागनिहाय घरी सामान मिळेल याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला केवळ जीवनावाश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर येण्याची मुभा राहणार आहे,’ असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांनी प्रशासनाकडे नोंद करावी :

आपल्या आसपास कोणी परदेशातून अथवा राज्यातील करोनाबाधित प्रदेशातून आले असल्यास प्रशासनाला माहिती द्या. तसेच त्यांनी स्वत:हून आपण आल्याची नोंद तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाकडे करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या सूचनांचे पालन येणाऱ्या लोकांनी केले नाही, तर प्रशासनाला कडक कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ही माहिती मध्यवर्ती नियंत्रण कक्षात द्यायची आहे. फोन क्रमांक (०२३५२) २२२२३३, २२६२४८

करोना संसर्गाबाबतही काही अतिरिक्त माहिती हवी असल्यास वरील क्रमांकांवर संपर्क साधावा.

या माहितीसाठी ७०५७२ २२२३३ हा व्हॉट्सॲप क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply