रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरीची भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता. १८ मे) राबविण्यात आलेल्या डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचा खेडशीतील २५० नागरिकांना लाभ झाला.
या उपक्रमांतर्गत मोबाइल डिस्पेन्सरी (ओपीडी) व्हॅन खेडशीतील श्रीनगर आणि लक्ष्मीनारायण नगरात दाखल झाली. यावेळी ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजारांवर विनामूल्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि औषधांचे वितरणही मोफत करण्यात आले. शिबिरात प्रत्येक व्यक्तीला करोनाचा प्रादुर्भाव आणि संरक्षणाची माहिती देतानाच नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक गोळ्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार तोंडाला मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंग आणि हाताला सॅनिटायझर लावून करोनाप्रतिबंधक नियमांच्या अनुषंगानेच शिबिर पार पडले. श्रीनगर परिसरातील १५०, तर लक्ष्मीनारायण नगर परिसरातील १०० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा रुग्णालयातर्फे डॉ. अक्षता सप्रे आणि डॉ. निशाद काझी यांनी नागरिकांची तपासणी केली. त्यांना फार्मासिस्ट प्राची पाटील आणि परिचारिका प्रियांका पानगले यांनी साह्य केले. यावेळी भारतीय जैन युवा संघटनेचे महेंद्र गुंदेचा, मुकेश गुंदेचा उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रीनगर रहिवासी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश कसबेकर, उपाध्यक्ष श्रीकांत रानडे, सचिव संदीप पाटील, सदस्य संदेश भागवत, वसंत शिंदे, दत्ताराम जोशी, योगेश काताळकर, मंगेश चव्हाण, विकास कामेरकर, सिद्धेश जोशी, शेखर सावंत यांनी प्रयत्न केले. लक्ष्मीनारायण नगर, एकता नगर, गणेश नगर रहिवासी संघ, मथुरा पार्क, सरस्वती नगर रहिवासी मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच खेडशी ग्रामपंचायतीचे प्रभाग क्र. ५ चे सदस्य वसंत बंडबे आणि सौ. स्नेहा स. लाखण यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. दोन्ही ठिकाणी परिसरातील तरुणांचे चांगले सहकार्य झाले.
शिबिराची वेळ संपल्याने लक्ष्मीनारायण नगर परिसरात शिबिराचा लाभ ज्यांना होऊ शकला नाही, त्यांच्यासाठी येत्या २५ मे रोजी पुन्हा शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
