रत्नागिरी (१८ मे) : आज (१८ मे) रत्नागिरीतील ११९ रुग्णांचे अहवाल मिरज येथून प्राप्त झाले असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामध्ये ९९ अहवाल संगमेश्वरचे, १० अहवाल मंडणगडचे, तर १० अहवाल लांज्यातील होते. रत्नागिरीतील आतापर्यंतच्या करोना रुग्णांची संख्या ९२ असून, एकूण १७ रुग्णांना उपचारांनंतर पूर्ण बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात करोनाने आतापर्यंत तीन बळी घेतले आहेत. अगदी सुरुवातीला आढळलेल्या पाचही रुग्णांना उपचारांनंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी १२ रुग्णांना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या स्थितीनुसार सध्या रत्नागिरी जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या करोना रुग्णांची संख्या ७२ एवढी आहे.
उपचार सुरू असलेल्या ७२ जणांपैकी ३६ जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात चार, दापोली उपजिल्हा रुग्णालयात १४, गुहागर ग्रामीण आरोग्य केंद्रात एक, मंडणगड ग्रामीण रुग्णालयात ११, कामथे उपजिल्हा रुग्णालयात तीन जणांवर उपचार सुरू असून, तीन रुग्ण चिपळुणातील आहेत.
………………………….
रत्नागिरीची करोना रुग्णसंख्या ९२वर; सिंधुदुर्गातील दोन रुग्ण बरे होऊन घरी
रत्नागिरी (१७ मे) : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, आज (१७ मे) नवे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता ९२वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील दोन रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
आज (१७ मे) सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातील २७० अहवाल मिरज येथून प्राप्त झाले. त्यापैकी २६४ अहवाल निगेटिव्ह, तर सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. सहा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक रुग्ण खेड तालुक्यातील मुरडे येथील असून, तो कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे. तसेच, दापोलीतील कोळथरे कोंड येथील एक, तर कोंड्ये शिगवणवाडी येथील चार रुग्णांचाही त्यात समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कालही (१६ मे) चार नवे रुग्ण सापडले होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९२वर पोहोचली आहे. त्यातील तीन जणांचा बळी गेला असून, पंधरा जण उपचारांनंतर पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजच्या सहा जणांसह ७४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत आठ करोना रुग्ण आढळले असून, त्यापैकी चार जण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत. दोन रुग्णांना आज (१७ मे) सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वायंगणी (ता. वेंगुर्ला) व जांभवडे (ता. कुडाळ) येथील हे रुग्ण होते.
बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडताना आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कोरोनामुक्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शासकीय रुग्णवाहिकेत बसवून त्यांना घरी सोडले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. अविनाश नलावडे, फिजिशियन डॉ. नागेश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एम. मोरे, मेट्रन आर. जी. नदाफ, तसेच डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आदी उपस्थित होते.

संग्राह्य माहिती.
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका निहाय आठवडा निहाय मार्च पासून आतापर्यंत ची माहिती मिळेल का ?