२२ मेपासून रत्नागिरीत एसटी, रिक्षा आणि सलून सुरू होणार

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मे २०२०पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी २१ मे रोजी जारी केले. यात जिल्हांतर्गत एसटी बससेवा, तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये (सलून) यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशानुसार, क्रीडा संकुल व मैदाने, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून वैयक्तिक सरावास परवानगी असेल; मात्र समूह आणि प्रेक्षक जमा होतील असे क्रीडाप्रकार आयोजित करण्यास बंदी असेल.

तीन चाकी वाहने/रिक्षा वाहनचालक आणि दोन प्रवासी घेऊन सुरू करता येणार आहे. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी एसटी बस सेवा सुरू करता येणार आहे.

सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू ठेवता येतील; मात्र दुकानांच्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल. तसेच दुकानासमोर एकाच वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

अत्यावश्यक सेवा व त्याव्यतिरिक्त इतर सेवा यांच्यासाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून पुरविण्यास मान्यता असेल. कुरिअर आणि पोस्टाच्या सेवा सुरू राहतील.

केशकर्तनालये, स्पा आदी दुकाने समाजिक अंतर ठेवून आणि करोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील.

अंत्यविधी व अंत्ययात्रेच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. सर्व शासकीय कार्यालये १०० टक्के उपस्थितीत सुरळीत सुरू ठेवता येतील. या कार्यालयांमध्ये मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल.

महाराष्ट्र शासनाच्या १९ मे २०२० रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४मधील बदल करणारा हा आदेश शुक्रवार २२ मे २०२०पासून लागू असेल, असे आदेशात म्हटले आहे.

रत्नागिरी शहर परिसरासाठी
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

2 comments

Leave a Reply