निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीदरम्यान अशी घ्या काळजी…

रत्नागिरी : आज १ जून २०२० पासून येत्या ४ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग नावाचे चक्रीवादळ येत असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

(अरबी समुद्रातील आजच्या स्थितीचे (एक जून ) ताजे छायाचित्र वर दिले आहे. हवामान खात्याने आज दिलेला ताजा अंदाज वाचण्यासाठी येथे क्लिक करा. एक ते तीन जून या कालावधीत दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीन जूननंतर हे चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. )

वादळात वाऱ्याचा वेग खूप जास्त असण्याची शक्यता असून मुसळधार पाऊसही पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याविषयीच्या सूचना अशा :

  • मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रात जाऊ नये.
  • बुधवार, ३ जून २०२० रोजी आपले घर सुरक्षित असल्यास अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. घराच्या बाहेर पडू नये.
  • आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.
  • घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विेजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून दूर राहावे.
  • आपले पशुधन आणि अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.
  • आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदील) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
  • हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
  • आवश्यक अन्नधान्य्, पिण्याचे पाणी, औषधे इत्यादी जवळ ठेवावे.
  • आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य दयावे.
  • पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरावे. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडिक्लोर मिसळावे.
  • मच्छीमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये, म्हणून त्या सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
  • अतिवृष्टी आणि चक्रीवादळ यांचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
  • ग्रामकृतीदलाच्या सूचनेनुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
  • सदयःस्थितीत जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक होम क्वारंटाइन असलेले नागरिक आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना एकमेकांत मिसळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  • मदत आवश्यक असल्यास आपली ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.
    संपर्क साधण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक असे : (02352) 226248, 222233.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply