करोना रुग्णांमध्ये रत्नागिरीत १८ने, तर सिंधुदुर्गात १६ने वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (एक जून) सकाळी मिळालेल्या अहवालांनुसार करोनाबाधितांची संख्या १८ने वाढली. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आज (एक जून) १६ने वाढ झाली. त्यामुळे रत्नागिरीतील करोना रुग्णांची एकूण संख्या २८७, तर सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या ७२वर पोहोचली आहे.

आज रत्नागिरी जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांत रत्नागिरीतील सात, कळंबणीच्या उपजिल्हा रुग्णालयातील आठ, गुहागरच्या एका आणि राजापूरच्या दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता २८७ झाली आहे. काल (३१ मे) सायंकाळी उशिरा एका रुग्णाला, तर आज आणखी १३ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता ११३ झाली आहे. मृतांची एकूण संख्या नऊ आहे. विविध रुग्णालयांमध्ये सध्या १६२ जण उपचारांखाली आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ६२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिरज येथील प्रयोगशाळेकडे ३३३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

दरम्यान, परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या दिवसात तीन हजार ६१५ जण दाखल झाले. त्यामुळे बाहेरून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची आजपर्यंतची एकूण संख्या एक लाख आठ हजार ७८७ झाली आहे. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात, तसेच परराज्यात गेलेल्या मजूर व इतरांची संख्या ३८ हजार ९२५ आहे. त्यातील १० हजार २३१ जण रेल्वेने गेले, तर बाकीचे मजूर खासगी बसेस वा एसटीने गेले. जिल्ह्यात होम क्वारंटाइनखाली असलेल्यांची संख्या घटून ८२ हजार ४६९ झाली आहे. कालपर्यंत ही संख्या ९३ हजार ४५८ एवढी होती.

सिंधुदुर्गात रुग्णसंख्येत १३ने वाढ
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाला आज (एक जून) सकाळी प्राप्त झालेल्या १३३ अहवालांपैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह आले. तथापि त्यात पूर्वीच्या करोनाबाधित व्यक्तीचा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत १३ने वाढ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १७ महिन्यांच्या एका बाळाचा समावेश आहे. एक जून रोजी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांपैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मालवण, देवगड आणि कणकवली तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७२ झाली आहे. सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाचा मृत्यू झाला असून, एक जण उपचारांसाठी मुंबईला गेला आहे. ६३ जणांवर उपचार सुरू आहेत.

परराज्यातून व महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण ६२ हजार ६०९ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २७ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून, त्यापैकी ४०४ व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. २६ हजार १७५ व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात एक हजार २५२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply