रत्नागिरी : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे. (चक्रीवादळाचा अपेक्षित मार्ग हवामान खात्याने जाहीर केला असून, तो वर दिला आहे.)
हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असून, तीन जूनच्या दुपारपर्यंत ते रायगडातील हरिहरेश्वर आणि दमण यामधील भागातून किनारपट्टी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि कोकणात राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात तीन जूनला संचारबंदी जाहीर केली आहे.

अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेल्या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू आज (दोन जून) पहाटे साडेपाच वाजता पणजीच्या नैर्ऋत्येकडे २८० किलोमीटर अंतरावर होता. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. ते उत्तरेकडे सरकत असून, तीन जूनच्या दुपारपर्यंत ते रायगडातील हरिहरेश्वर आणि दमण यामधील भागातून किनारपट्टी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातसाठी हवामान विभागाने ‘येलो मेसेज’ अर्थात आपत्तीसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे.
येत्या २४ तासांत कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा किनारा, तसेच उत्तरेकडील भागांत आणि मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
तीन जूनला उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, गुजरातचा दक्षिण भाग, दमण, दादरा आणि नगर हवेली या भागांत मुसळधार पाऊस होणार आहे. या परिसराच्या काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीन जूनला मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैर्ऋत्य भाग आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
चार जूनलाही वरील सर्व भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
वाऱ्यांचा वेग…
अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग सध्या ताशी ५५ ते ६५ किलोमीटर असून, तीन जूनला सकाळपासून रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या किनाऱ्यांवर वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असू शकतो. गुजरातच्या काही भागांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर तीन जूनच्या दुपारपासून ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असे अंदाजात म्हटले आहे.
मोठ्या लाटा…
मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांच्या किनारी भागात नेहमीपेक्षा एक ते दोन मीटर अधिक उंचीच्या लाटा उसळू शकतात. तसेच, रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यांवर नेहमीपेक्षा अर्धा ते एक मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. त्यामुळे या सर्व प्रदेशातील सखल भागांत पाणी साचण्याचा धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मच्छिमारांना इशारा
कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मच्छिमारांनी किमान तीन जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
हे नुकसान अपेक्षित
इशारा दिलेल्या सर्व भागांत कच्ची घरे, झोपड्यांचे नुकसान होऊ शकते, पत्रे उडू शकतात, वीजवाहक तारा, तसेच फोनच्या तारा आदींचे नुकसान होऊ शकते. झाडे उन्मळू शकतात, किनारी भागांतील पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
नोंदींच्या इतिहासात मुंबईत पहिलेच वादळ
अरबी समुद्राचे भौगोलिक स्थान असे आहे, की बंगालच्या उपसागरांपेक्षा अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती कमी प्रमाणात होते. तसेच, चक्रीवादळांची निर्मिती झालीच, तरी त्यातील बहुतांश वादळे ओमान, एडनचे आखात किंवा गुजरातकडे जातात. मुंबईला त्याचा धक्का पोहोचत नाही. १८९१ साली हवामानाच्या नोंदी ठेवायला सुरुवात झाल्यापासून मुंबईत चक्रीवादळ आलेले नाही. या वेळी प्रथमच हे वादळ मुंबईत धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

‘एनडीआरएफ’चे जवान तैनात
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत तीन, पालघर आणि रायगडमध्ये प्रत्येकी दोन, तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) प्रत्येकी एकेक टीम तैनात करण्यात आली आहे. या जवानांनी त्या त्या भागाचे सर्वेक्षण कालपासूनच सुरू केले असून, स्थानिक नागरिकांचे प्रबोधन सुरू केले आहे. राज्य आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.