चक्रीवादळ अलिबागला धडकणार; रत्नागिरीतील चार हजार जणांचे स्थलांतर

रत्नागिरी/मुंबई : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे अखेर निसर्ग चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ते तीन जून रोजी दुपारी ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने अलिबागच्या जवळ किनाऱ्यावर धडकणार आहे. याबद्दलचा ‘ऑरेंज मेसेज’ (चक्रीवादळाची पूर्वसूचना/दक्षतेचा इशारा) हवामान विभागाने जाहीर केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या उत्तर कोकणातील जिल्ह्यांसह दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांना या वादळाचा थेट फटका बसणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहणार आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांमधील चार हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून तीन जूनला सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (या सर्व मुद्द्यांची विस्तृत माहिती खाली दिली आहे.)

चक्रीवादळाच्या पुढे सरकण्याबद्दलची स्थिती आणि त्याचा पुढील मार्ग दर याची माहिती दर दोन ते तीन तासांनी हवामान विभागाकडून जाहीर केली जात आहे. दोन जूनला रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, पुढील १२ तासांत चक्रीवादळ अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असून, तीन जूनच्या दुपारपर्यंत ते रायगडातील हरिहरेश्वर आणि दमण यामधील भागातून किनारपट्टी ओलांडेल. अलिबागजवळ ते जमिनीला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि कोकणात राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात तीन जूनला संचारबंदी जाहीर केली आहे.

अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेल्या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू आज (दोन जून) सायंकाळी साडेपाच वाजता अलिबागच्या नैर्ऋत्येकडे ३०० किलोमीटर अंतरावर होता. येत्या १२ तासांत कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा किनारा, तसेच उत्तरेकडील भागांत आणि मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.


तीन जूनला उत्तर कोकण (मुंबई, पालघर, ठाणे, रायगड), मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग या प्रदेशात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम, काही ठिकाणी मुसळधार, तर काही भागांत अति मुसळधार (२४ तासांत किमान २०० मिमी) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीन जूनला दक्षिण कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.
तीन जूनला मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातही मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

वाऱ्यांचा वेग…
अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग सध्या ताशी ७० ते ८० किलोमीटर असून, आज (दोन जून) रात्री दक्षिण कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्यांवर तो १०० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तीन जूनला सकाळपासून रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या किनाऱ्यांवर वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असू शकतो. गुजरातच्या काही भागांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर तीन जूनच्या दुपारपासून ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असे अंदाजात म्हटले आहे.

मोठ्या लाटा…
मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांच्या किनारी भागात नेहमीपेक्षा एक ते दोन मीटर अधिक उंचीच्या लाटा उसळू शकतात. तसेच, रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यांवर नेहमीपेक्षा अर्धा ते एक मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. त्यामुळे या सर्व प्रदेशातील सखल भागांत पाणी साचण्याचा धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रातील हवामान अत्यंत खराब असणार आहे.

मच्छिमारांना इशारा
कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मच्छिमारांनी किमान तीन जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

हे नुकसान अपेक्षित
इशारा दिलेल्या सर्व भागांत कच्ची घरे, झोपड्यांचे नुकसान होऊ शकते, पत्रे उडू शकतात, वीजवाहक तारा, तसेच फोनच्या तारा आदींचे नुकसान होऊ शकते. झाडे उन्मळू शकतात, किनारी भागांतील पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

‘एनडीआरएफ’चे जवान तैनात
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईसह कोकणात आणि गुजरातमध्ये मिळून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) ४० टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, तीन टीम्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जवानांनी त्या त्या भागाचे सर्वेक्षण कालपासूनच सुरू केले असून, स्थानिक नागरिकांचे प्रबोधन सुरू केले आहे. राज्य आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चार हजार नागरिकांचे स्थलांतर
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आपत्ती निवारणविषयक उपाययोजनांची माहिती देण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दोन जूनला सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड हे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘जिल्ह्यात वादळाचा तडाखा रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांना तुलनेने कमी प्रमाणात जाणवेल. सर्वाधिक तडाखा मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्यांना बसणार आहे. हे लक्षात घेऊन मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेसवी, वेळास भागातील एक हजार २००, दापोली तालुक्यातील २३५ आणि गुहागर तालुक्यातील किनारपट्टी भागातील एक हजार १९६ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील २३ गावे किनारपट्टीवर आहेत. आतापर्यंत पावणेतीन हजार लोकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले असून सुमारे चार हजार जणांचे स्थलांतर केले जाणार आहे.’

श्री. मिश्रा म्हणाले, ‘चक्रीवादळाचा प्रभाव पहाटे सुरू होणार असून सकाळी नऊ वाजता वाऱ्यांचा वेग ताशी ८० किलोमीटर असेल. त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वादळ पूर्णपणे निघून गेल्यावर सर्व विद्युतवाहिन्यांची तपासणी केल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा चालू केला जाणार आहे. मदत आणि बचावकार्यासाठी ६४ रुग्णवाहिका, चार नौका आणि अन्य आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची २० जणांची एक तुकडी दापोलीत, तर दुसरी मंडणगडमध्ये सज्ज आहे.’

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे चिपळूण, खेड आणि दापोली नगरपालिकांना सावध करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply