रत्नागिरी : रत्नागिरीत आज करोनाचे नवे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची एकूण संख्या ३१९ झाली आहे. आणखी चार रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १३ हजार ३६३ चाकरमानी दाखल झाले आहेत; मात्र गृह विलगीकरणात ठेवलेल्यांची संख्या आता झपाट्याने कमी होत असून, आजअखेर ही संख्या ७७ हजार ७३२ एवढी आहे. जिल्ह्यात १८० जण संस्थात्मक विलगीकरणाखाली आहेत.
करोनाविषयक तपासणीसाठी रुग्णांच्या स्वॅबचे नमुने आतापर्यंत मिरज किंवा कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते. तेथून टप्प्याटप्प्याने अहवाल येत होते. काही वेळा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अहवाल येत असे. येत्या रविवारपासून त्यात बदल होणार आहे. कारण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात विषाणू प्रयोगशाळा सुरू होणार आहे. तिचे उद्घाटन येत्या रविवारी (ता. ७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत ही माहिती दिली. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी एक कोटी सात लाख रुपये खर्च आला आहे. या प्रयोगशाळेमुळे रत्नागिरीत दररोज २५० स्वॅबची तपासणी करणे शक्य होणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, सिंधुदुर्गात आज नवे चार रुग्ण सापडले असून, सिंधुदुर्गातील एकूण रुग्णसंख्या ८९वर पोहोचली आहे.
