रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार जून) आणखी १३ नव्या करोनाबाधितांची भर पडल्याने आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या ३३४ झाली आहे. काल (तीन जून) एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनाला बळी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात काल सहा आणि आज दोन नव्या रुग्णांची भर पडल्याने तेथील रुग्णांचा आकडा ९७ झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १३ रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एका रुग्णाचा काल मृत्यू झाला. आज बाधित म्हणून निष्पन्न झालेल्या रुग्णांपैकी गुहागरमधील दोन, कळंबणीत चार, कामथे येथील तीन, रत्नागिरीतील एक आणि संगमेश्वर येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. करोनावर मात केल्याने आज (चार जून) चौघांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १२५ जण पूर्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. १९८ जणांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १४ हजार ५३४ चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यापैकी होम क्वारंटाइनखाली असलेल्यांची संख्या ७७ हजार ७३२ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (चार जून) प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी दोन व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. हे दोन रुग्ण सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे आणि चौकुळ या गावातील आहेत. काल उशिरा जिल्ह्यातील रुग्णसंख्येमध्ये सहा जणांची भर पडली होती. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील तीन, तर सावंतवाडी, वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ती ६३ वर्षांची महिला महिला देवगड तालुक्यातील शिरगाव येथील होती. तिला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. पनवेल येथून आलेल्या या महिलेचा स्वॅब २८ मे रोजी तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल दोन जूनला प्राप्त झाला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ९७ झाली असून, १६ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण ७१ हजार ५०२ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
