राजापूर : करोनातील लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करीत राजापूरमधील बंगलवाडीतील जाधव कुटुंबीयांनी श्रमदानातून ५६ फूट खोल विहीर खोदून पाण्याचा प्रश्न मिटविला आहे. करोना आपत्तीकडे संकट म्हणून पाहिले जात असताना जाधव कुटुंबीयांनी त्या संकटाला संधी म्हणून पाहत स्वयंप्रेरणेतून महिनाभर राबून विहीर खोदली. त्यांनी कष्टपूर्वक पाणीटंचाईवर केलेली मात इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.
राजापूरच्या एसटी आगारानजीक बंगलवाडीत जाधव कुटुंबीय राहते. कोणी छोटा-मोठा व्यवसाय करतो, तर कोणी रिक्षा चालवतो. याच मार्गाने कुटुंबाचा चरितार्थ चालतो. करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे मात्र सारेच व्यवसाय बंद झाले. सक्तीने मिळालेल्या या सुटीच्या काळात काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यातूनच त्यांना विहीर खोदण्याची कल्पना सुचली.
या कुटुंबाला उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. राजापूर नगरपालिकेकडून मिळणारे पाणी दैनंदिन गरजेसाठी पुरत नाही. शिवाय ऐन उन्हाळ्यात पालिकेकडून पाण्याची कपातही होते. पाणीटंचाईची दर वर्षीची ही समस्या या कुटुंबाला या वर्षीही जाणवली. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्वच सदस्य घरी होते. सतत काही ना काही तरी करीत व्यस्त राहणाऱ्या या कुटुंबाने घरी केवळ बसून राहण्यापेक्षा श्रमदानातून विहीर खोदून पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा निर्धार केला.
लॉकडाऊनच्या काळात त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. कुटुंबाचे प्रेरणास्थान बाळकृष्ण जाधव, भाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जाधव, शशिकांत शिंदे, परेश जाधव, किसन जाधव, अजिंक्य जाधव, सतीश जाधव, यज्ञेश धुरी, भगवान धुरी, सुनील तांबे, कुणाल तांबे, संजय किरंजे, विश्वनाथ ननावरे, विवेक पाटील यांच्यासह कुटुंबातील बुजुर्गांनीही विहीर खोदकामासाठी मदत केली. भवानीप्रसाद मित्रमंडळानेही मोलाचे सहकार्य केले.

सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने खोदकाम करण्यात आले. माती उपसण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर न करता त्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग केला. घरातील १५ माणसांनी ३२ दिवसांत केलेल्या या अविश्रांत श्रमाचे चीज झाले. विहिरीला ५६ फुटांवर पाणी लागले. ऐन उन्हाळ्यातही विहिरीत चांगला पाणीसाठा असून, जाधव कुटुंबीयांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे.
मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना १४ ते २८ दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागते. कोकणात अनेक ठिकाणी शाळा किंवा इतर ठिकाणी विलगीकरणात ठेवलेल्या चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना मोकळा वेळ मिळाल्यामुळे अशा अनेक चाकरमान्यांनी श्रमदानातून साफसफाई, पाणवठे स्वच्छ करण्यासारखी अनेक कामे केली; पण जाधव कुटुंबीय मुंबईतून आलेले नाही. करोनाची बाधा झाल्यामुळे किंवा कोणा बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे ते विलगीकरणातही राहिलेले नाहीत; पण करोनाच्या संकटाचा त्यांच्यावरही परिणाम झाला. उद्योग-व्यवसाय सक्तीने बंद करावे लागले. या संकटाकडे त्यांनी संधी म्हणून पाहिले आणि त्या संधीचे सोने केले. राजापूरचे सामाजिक कार्यकर्ते विवेक गुरव यांच्यासह अनेकांनी जाधव कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.

One comment