चक्रीवादळामुळे रायगडात काही लाख घरांचे नुकसान; रत्नागिरीत तीन हजार झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी/मुंबई : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. तेथे तीन हजार झाडे आणि विजेचे एक हजार ९६२ खांब मोडून पडले आहेत. रत्नागिरीत महावितरणची १४ उपकेंद्रे कालच्या वादळात नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. वीजपुरवठ्याअभावी पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळित झाली आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरू व्हायला आणखी दोन ते तीन दिवस लागतील, असे महावितरण कंपनीने जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला.

रत्नागिरी जिल्ह्यात चार जूनला सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ९३.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लांजा तालुक्यात (१३१ मिमी) झाली आहे. मंडणगड १३० मिमी, दापोली १२५ मिमी, खेड ७६ मिमी, गुहागर ७७ मिमी, चिपळूण १०२ मिमी, संगमेश्वर ७३ मिमी, रत्नागिरी ४० मिमी, राजापूर ८७ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. मंडणगड तालुक्यात मौजे मंडणगड येथे उपअभियंता यांचे निवासस्थान व सहा शेडच्या छतावरील पत्रे वादळीवाऱ्यात उडून अंशत: नुकसान झाले. दापोली, चिपळूण, मंडणगड तालुक्यांतही अनेक ठिकाणी झाडे पडून, विजेचे खांब पडून, घरांवरचे पत्रे उडून नुकसान झाले.

लगेच पंचनाम्यांचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून, महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरू करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधनसामग्री उपलब्ध करावी,’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा आज (चार जून) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते.

रायगडात एनडीआरएफचे जवान करत असलेले मदतकार्य (सर्वांत वरील फोटो मंडणगडचा)

रायगडातील परिस्थिती
रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे म्हणाल्या, ‘रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. श्रीवर्धन आणि मुरुडमध्ये चक्रीवादळ धडकले, त्याचा फटका श्रीवर्धनला जास्त बसला असून, सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत. जिल्ह्यांत पाच हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत; मात्र अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही पाठवणे शक्य झालेले नाही. दूरध्वनी व मोबाइल सेवा खंडित झाल्याने ते घाबरले आहेत. त्यांना इतरांशी संपर्क शक्य होत नाही. टेलिकॉम यंत्रणा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीज नसल्याने ५०० मोबाइल टॉवर बंद पडले आहेत असे सांगण्यात आले. १० बोटींचे अंशत: नुकसान झाले असून, १२ हेक्टर मत्स्यशेती खराब झाली आहे.’

ठाण्यातील परिस्थिती
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ठाणे जिल्ह्याला सुदैवाने धोका पोहोचला नाही. पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.’ जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले, ‘ठाण्याला विशेष फटका बसला नाही. १६२ कच्च्या घरांची पडझड झाली, झाडांच्या फांद्या पडल्याच्या ३६० घटना घडल्या. जिल्ह्यातील सर्व मार्ग व महामार्ग सुरू झाले आहेत. उल्हासनगर येथे काही वेळासाठी दूरध्वनी सेवा खंडित झाली होती.’

मुंबई शहरात २५ ठिकाणी झाडे पडली, तर मुंबई उपनगरमध्ये ५५ ठिकाणी झाडे पडली, तसेच दोन घरांची पडझड झाली.

प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन) किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले, की या वादळामुळे राज्यात सरासरी ७२.५ मिमी पाऊस झाला. सर्वांत जास्त पाऊस १५२ मिमी जालना येथे झाला. राज्यात ७८ हजार १९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. २१ एनडीआरएफची आणि सहा एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली होती.

राज्यात सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, सहा जनावरे दगावली तर १६ नागरिक जखमी झाले. रायगड जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार ५०३३ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान लगेच द्यावे, असेही निंबाळकर यांनी सांगितले.

(एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनचे उपप्रमुख सच्चिदानंद गावडे यांनी दिलेली मदतकार्याची माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओत…)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply