चक्रीवादळ अखेर मंदावले; अचूक अंदाज, योग्य नियोजनामुळे जीवितहानी टळली

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी/अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या किनाऱ्यावर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने धडकलेले निसर्ग चक्रीवादळ अखेर मंदावले आहे. या वादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे; मात्र हवामानाचे योग्य अंदाज, त्यानुसार त्या त्या यंत्रणांनी केलेले उत्तम नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यांमुळे सुदैवाने मोठ्या जीवितहानीचे संकट टळले. रायगडात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, रायगडात एक, तर रत्नागिरीत चार जण जखमी झाले आहेत. हे वादळ आता वेग कमी करून पुणे, नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्राकडे मार्गक्रमण करील आणि त्याचे पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल आणि त्याची तीव्रता चार जूनपर्यंत पूर्ण ओसरेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ या संस्थांचे जवान, स्थानिक आपत्ती निवारण यंत्रणा, तसेच जिल्ह्यांची प्रशासने या सर्वांच्या मदतकार्यातून जनजीवन मूळपदावर येत आहे.

हे चक्रीवादळ तीन जूनला दुपारी अलिबागजवळ किनाऱ्याला धडकले. त्यामुळे अलिबाग तालुक्याच्या उमटे गावात विजेचा डीपी अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अलिबागनजीक रामराज येथेही डीपी पडल्याने एक व्यक्ती जखमी झाली असून, तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. (रायगड जिल्ह्यातील नुकसानाचा आणि मदतकार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

रत्नागिरीचा आढावा
रत्नागिरीच्या भगवती बंदरात उभ्या राहिलेल्या, डिझेल वाहतूक करणाऱ्या बोटीचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढऱ्या समुद्रापर्यंत आली. त्यावरचे १० भारतीय आणि तीन परदेशी खलाशी सुखरूप आहेत. झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद होणे, विजेचे खांब वाकून पडणे असे प्रकार घडल्याने, तसेच ताशी ९० ते १३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सायंकाळनंतर ते हळूहळू पूर्वपदावर आले. विजेचे असंख्य खांब मोडून पडल्यानं खेड आणि चिपळूण विभागातल्या मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला असून, तो पूर्वपदावर यायला विलंब लागणार असल्याचं अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने अनेक ठिकाणी खूप मोठे नुकसान झाले.‌ रात्री साडेबारा वाजल्यानंतर वादळाचा वेग हळूहळू वाढू लागला.‌ पहाटे साडेपाच वाजल्यानंतर वादळाने आणखी तीव्र स्वरूप धारण केले‌. ताशी ९० ते १३० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या मोडून पडल्या.‌ रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर वडाचे झाड मोडून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.‌ गुहागर आणि मंडणगड तालुक्यात किनारपट्टीवरच्या बागांमध्ये नारळी-पोफळीची झाडे मोडून पडली. रत्नागिरी, गुहागर आणि दापोली तालुक्यात घरांवर झाडे मोडून पडल्याच्या काही घटना घडल्या. रत्नागिरी जिल्ह्यात या वादळामुळे चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विजेच्या तारांवर झाडे मोडून पडल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. रत्नागिरी शहरात आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही. समुद्र खवळलेला होता. दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. दुपारनंतर रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील वादळाचे प्रमाण कमी झाले. दापोली आणि मंडणगडमध्ये मात्र दुपारनंतरही सोसाट्याचे वारे सुरू होते. चक्रीवादळामुळे रत्नागिरीत नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरू झाले असून, नुकसान झालेल्यांना दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे दोघेही अधिकारी मदतकार्यात स्वतः प्रत्यक्ष फिल्डवर उतरले होते. (व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे तीन जूनला सात तालुक्यांत नुकसान झाले; मात्र कोठेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती निवासी उपजिल्हधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

सावंतवाडी तालुक्यात विनायक पारकर (रा. डामरे) यांच्या राहत्या घरावर झाड पडून नुकसान झाले. तळवणे गावामध्ये झाडे पडून तीन घरांचे नुकसान झाले. वेंगुर्ला तालुक्यात नारायण मेस्त्री (रा. मातोंड) यांच्या घरावर झाड पडून १५ हजार रुपयांचे तर गोपाळ गावडे (रा. वजराट) यांच्या घरावर झाड पडून चार हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विजय नाईक (रा. मळेवाड) यांच्या घराचे पत्रे उडून दोन हजारांचे नुकसान झाले. मालवण, आचरा, तळगाव, चिंदर भटवाडी, देवगड, तांबळडेग, पोयरे, करुळ, कळसुली, डामरे, वैभववाडी, ऐनारी या गावांत/तालुक्यांत घरावर झाडे पडून नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यात कोठेही नुकसान झाले नाही. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) शुभांगी साठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

राजापूर तालुक्यात एका घराचं नुकसान झालं.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने असे पेलले आव्हान

चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याला धडक देऊन मुंबईकडे जाणार असल्याचं जाहीर झाल्यापासून रत्नागिरी जिल्हा प्रशासन मदत आणि बचावकार्यासाठी नियोजन करत होतं. ते उत्तम रीतीने पार पडलं यात शंका नाही. याचं कारण आज संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत वादळामुळे जीवितहानी झाल्याचं एकही वृत्त आलेलं नव्हतं. जिल्ह्यात चौघेजण किरकोळ जखमी झाले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज म्हणजे तीन जून रोजी संपूर्ण संचारबंदी जाहीर केली होती. मात्र वादळ पहाटेपासूनच सुरू झाल्यामुळे कुणीही रस्त्यावर येण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळेही जीवितहानी झाली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनीही सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तेथील पोलीस केवळ बंदोबस्त करत नव्हते, तर मोठं वादळी येणार असल्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या बाबतीत ते लोकांचं प्रबोधन करत होते, हे विशेष.

वादळ आल्यानंतर मालमत्तेचं नुकसान झालं. रस्त्यावर झाडं उन्मळून पडली. गणपतीपुळे मंदिराचा परिसर, रत्नागिरी ते कोल्हापूर, नाणीज, दापोली-खेड रस्ता झाडं कोसळल्यानं बंद पडला. जैतापूर, देवरूख, रत्नागिरी, गुहागर आणि दापोलीचा पशुवैद्यकीय दवाखाना अशा इमारतींचं झाडं मोडून पडल्यामुळे नुकसान झालं. मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्यांना वादळाचा मोठा फटका बसणार असल्याचं नक्की झाल्यानंतर त्या तीन तालुक्यांमधल्या चार हजार जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. वीजप्रवाह आधीच खंडित करण्यात आला होता. झाडांच्या फांद्या पडल्यामुळे अनेक खांब आणि तारा तुटून पडल्या. त्यांची दुरुस्ती व्हायला वेळ लागणार असला तरी लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सध्या रत्नागिरी जिल्ह्यावरही लक्ष ठेवून आहेत. ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मदत आणि बचाव कार्यात वाहून घेतल्याचं दिसत होतं. वादळात झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीनं देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची ग्वाही श्री. सामंत यांनी सायंकाळी दिली.

या वादळानं बारा वर्षांपूर्वी आलेल्या फयान नावाच्या चक्रीवादळाची आठवण अनेकांना झाली. तेव्हाही ताशी १२० किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. यावेळच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल आल्यानंतरच नुकसानीचा आकडा समजणार असला, तरी फयान वादळातल्या नुकसानीपेक्षा यावेळचं नुकसान तुलनेनं कमी असण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाचं योग्य नियोजन त्याला कारणीभूत आहे, त्याचबरोबर नागरिकांनीही वादळ समजून घेतलं आणि खबरदारीच्या उपाययोजना आधीच केल्या. त्यामुळे हे शक्य झालं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची संख्या तीनशेपेक्षा अधिक झाली आहे. या आजाराचं ओझं डोक्यावर असताना प्रशासन आणि जनतेनं चक्रीवादळाचं आव्हानही सहजपणे पेललं हे आजच्या वादळातून स्पष्ट झालं.

(चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि मदतकार्य यांचे फोटो पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या फेसबुक पेजला किंवा इन्स्टाग्रामला भेट द्या. संबंधित शब्दांवर क्लिक करा. )

Leave a Reply