महामानवाच्या स्मारकाने दिला अनेकांना आधार

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. त्यात मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. घराची छपरे उडून जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाने गावातील अनेक कुटुंबांना आधार दिला.

गेल्या ३ जून रोजी अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. सुमारे ४० हजार घरांना वादळाचा कमी-अधिक प्रमाणात फटका बसला. मंडणगड तालुक्यात ७ इमारतींना धोका पोहोचला. तालुक्यातील किंजळघर, आंबवणे बुद्रुक, घोसाळे, पणदेरी, उंबरशेत, पेवे कोंड, वेळास, बाणकोट, वाल्मीकीनकगर अशा १०९ गावांतील शेकडो घरांची छपरे उडून गेली. काही गावांमधील एकाही घरावरचे छप्पर जागेवर राहिले नाही. कौलांचे तुकडे तुकडे जमिनीवर विखुरले. सिमेंटच्या पत्र्यांचीही तीच स्थिती होती.

आंबडवे (ता. मंडणगड) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गावही वादळाच्या तडाख्यातून वाचले नाही. गावात प्रचंड नुकसान झाले. लोक उघड्या डोळ्यांनी आपले घरदार उद्ध्वस्त होताना पाहत होते. अशा स्थितीत काही वर्षांपूर्वी बांधलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक गावातील लोकांचे आश्रयस्थान बनले. स्मारकाच्या बाजूच्या घरांमधील लोक निवाऱ्यासाठी या स्मारकात धावले आणि सुरक्षित राहिले. मानवजातीचा तारणहार समजल्या जाणाऱ्या त्या महामानवाने आयुष्यभर दीनदुबळ्यांसाठी कार्य केलेच, पण त्यांचे स्मारकही ग्रामस्थांसाठी तारणहार ठरले. तेथे आश्रय घेतलेल्या साऱ्यांच्या जीविताचे रक्षण झाले. विजेचे खांब कोसळल्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला. गावाकडे येणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे २० खांब मोडून पडले. ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी कालच दिले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांवर झाडेही पडली. मोबाइल टॉवर कोसळून पडल्याने संपर्काचे महत्त्वाचे साधन बंद पडले. त्यामुळे ही सारी माहिती प्रशासनापर्यंत पोहोचायलाही विलंब झाला.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी आज मंडणगड तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात आंबडवे गावाचा समावेश होता. बाबासाहेबांच्या स्मारकाला त्यांनी भेट दिली. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना महामानवाच्या स्मारकामुळे आपला बचाव झाल्याचे आवर्जून सांगितले. गावाचे जनजीवन शक्य तितक्या लवकर सुरळित करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

पालकमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply