रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेली आणि नंतर अल्प प्रमाणात सुरू झालेली एसटीची वाहतूक उद्यापासून (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. रत्नागिरीत टप्प्याटप्प्याने शहर बस वाहतुकीसह जिल्हांतर्गत सेवाही सुरू करण्यात येणार आहे; मात्र प्रत्येक बसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी घेतले जाणार नाहीत. सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले.
तसेच, प्रवासीसंख्या मर्यादित असली, तरी प्रवासभाडे नेहमीप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक किंवा अन्य ज्या ज्या सवलती दिल्या जातात, त्याही नियमाप्रमाणे दिल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात सुरू केलेल्या एसटीचे भाडे दुप्पट, चौपट घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही जिल्हांतर्गत सेवा सुरू होणार आहे.

