कोकणातील नुकसानग्रस्त बागायतदारांनी कंदपिके घ्यावीत; कोकण कृषी विद्यापीठाचे आवाहन

दापोली : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील बागायतदारांनी त्वरित उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने कंदपिके घ्यावीत, असे आवाहन दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील बागायतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. बागा स्वच्छ करून पुन्हा लागवड केली, तरी त्यापासून उत्पन्न मिळायला सहा-सात वर्षे जाणार आहेत. त्यामुळे एवढ्या कालावधीत उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न तेथील बागायतदारांवर निर्माण झाला आहे. याबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि दापोलीचे पत्रकार प्रशांत परांजपे यांनी काही सूचना विद्यापीठाला केल्या होत्या. तसेच विद्यापीठाने मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले होते. याबाबत एखादा कृती आराखडा विद्यापीठाने तयार करावा, असे त्यांनी सुचविले होते.

कुलगुरू डॉ. सावंत आणि विस्तार शिक्षण संचालक, कुलसचिव, अधिष्ठाता, संशोधन अधिकारी आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी या सूचनेचे स्वागत केले. कुलगुरू डॉ. सावंत यांनी त्यावर सुचविले, की आता सुरू होत असलेल्या पावसाळ्यात शेतकऱ्यांनी कंदपिकांची लागवड करावी. रताळी, सुरण, कणगर, टॅपिओका अशा कंदपिकांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत काही प्रमाणात उत्पन्न मिळेल. दोन-तीन महिन्यांनी बागांची सफाई झाल्यानंतर तेथील जमिनीवर भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केल्यास साधारणतः डिसेंबरपर्यंत पीक हातात येईल. त्यामुळे बागायतदारांना उत्पन्नाचे साधन सुरू होईल. गावागावांनी नियोजनबद्धरीत्या भाजीपाला केला, तर तेथे तयार होणारे उत्पन्न घाऊक बाजारपेठेत पोहोचेल इतके होईल, जेणेकरून वाई आणि पुणे येथून येणाऱ्या भाजीला स्थानिक पर्याय उपलब्ध होईल आणि बागायतदारांचे आर्थिक गणित जुळण्यास मदत होईल. त्याच दरम्यान पुन्हा बागायतींमध्ये नारळी, पोफळी आणि इतर लागवड करावी, असे कुलगुरूंनी सूचित केले आहे.

कुलगुरूंचा सल्ला जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा व्हिडिओ



Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply