रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तीचे प्रमाण ५७ टक्के; सिंधुदुर्गात १० नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित व्यक्ती करोनामुक्त होण्याचे प्रमाण ५७ टक्के झाले आहे. आज (१० जून) दिवसभरात १६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या २११ झाली आहे. रत्नागिरीतील करोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्गातील करोनाबाधितांची संख्या १४० झाली असून, आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीच्याच प्रयोगशाळेतून आज मिळालेल्या अहवालांनुसार रत्नागिरी आणि लांज्यातील प्रत्येकी एक असे दोघे बाधित आढळले असून, बाधितांची संख्या ३७० झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील बेलारी गावातील ८५ वर्षे वृद्धाचा आज जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १५ झाली असून, आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४४ आहे.

आज (१० जून) घरी सोडण्यात आलेल्या १६ जणांमध्ये जिल्हा रुग्णालयातील ५, लांजा येथील २, सावर्डे येथील ५ आणि रत्नागिरीच्या समाजकल्याण भवनातील कोविड केअर सेंटरमधील चौघांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या ६६ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात ९ गावांमध्ये, गुहागर तालुक्यात ५, खेड तालुक्यात ६, संगमेश्वर तालुक्यात ७, दापोलीत ९, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात १४ आणि राजापूर तालुक्यात १० गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ७६ रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – २९, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – ११, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ९, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी -३, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टीट्यूट, लवेल, खेड – १५, ग्रामीण रुग्णालय, गुहागर- २, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर – १, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – ४, ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर- २.

होम क्वारंटाइनची संख्या आजही आणखी ५ हजारांनी घटली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची आजची संख्या ५८ हजार ५५० आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण सात हजार ६३ नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी सहा हजार ५९५ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ३७० अहवाल पॉझिटिव्ह असून, ६ हजार २०३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी ४६८ नमुन्यांचा अहवाल मिळायचा आहे. त्यातील ४ अहवाल कोल्हापूर येथे, ४२५ अहवाल मिरजला आणि रत्नागिरीच्या काल सुरू झालेल्या प्रयोगशाळेत ३९ अहवाल प्रलंबित आहेत.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील करोना प्रयोगशाळा सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल (ता. ९ जून) ई-उद्घाटन झालेल्या जिल्हा रुग्णालयातील विषाणू प्रयोगशाळेचे कामकाज सुरू झाले आहे. तेथे आज २२ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यातील २२ निगेटिव्ह, तर २ पॉझिटिव्ह आले आहेत.

आज तपासलेल्या नमुन्यांपैकी १० रत्नागिरीचे होते. त्यापैकी ९ निगेटिव्ह, तर एक पॉझिटिव्ह आला. लांजा येथील १२ नमुन्यांपैकी ११ निगेटिव्ह, तर एक पॉझिटिव्ह आहे.

लॅबमध्ये सध्या तपासणी प्रक्रियेत तंत्रज्ञांचा सहभाग आहे. तथापि याला पूर्णपणे मानवविरहित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी काल केली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असून, त्यासाठी १५ लाखांचा अधिक निधी देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानुसार यंत्रखरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या करोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आज (१० जून) आणखी १० व्यक्ती करोनाबाधित झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील कळसुली येथील एक, असलदे येथील एक, देवगड तालुक्यातील मीठमुंबरी येथील एक, कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे, नेरूर येथील प्रत्येकी एक, सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये, निरडवे येथील प्रत्येकी एक आणि बांदा येथील दोन, तर मालवण तालुक्यातील आचरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण १४० करोनाबाधित रुग्णांपैकी ४१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply