रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४४९ झाली आहे. त्यापैकी ३३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या १५६ वर पोहोचली असून, १०१ रुग्ण बरे झाले आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ जून) सायंकाळपर्यंत मिळालेल्या अहवालात चार नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये दापोली आणि देवरूखमधील प्रत्येकी एक, तर रत्नागिरीतील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४४९वर पोहोचली. दिवसभरात नऊ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या ९८ रुग्ण उपचारांखाली आहेत. दिवसभरात कोव्हिड केअर सेंटर, घरडा लोटे येथून पाच, तर कोव्हिड केअर सेंटर, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील चार रुग्णांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात सध्या ३० कंटेन्मेंट झोन म्हणजे करोनाबाधित क्षेत्रे आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (१६ जून) दोन नवे करोना रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या १५६ झाली आहे. जिल्ह्यातील आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १०१ झाली आहे. काल नव्या सापडलेल्या रुग्णांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील एक आणि मालवण तालुक्यातील आडवली येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण ९९ हजार ५०१ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
…………………………