रत्नागिरी : येत्या २१ जून रोजी होणार असलेल्या जागतिक योग दिनानिमित्ताने जिल्हा रुग्णालय आणि आयुष विभागातर्फे आगळीवेगळी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे.
पावस येथील आर. आर. फाऊंडेशन (मेडिकल आणि एज्युकेशन), जिल्हा आयुष विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होईल. योगासनांच्या साह्याने व्यसनमुक्ती आणि निरोगी आयुष्य हा या स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी ३० सेकंदांच्या दोन भागांचा एक व्हिडिओ स्वतःच तयार करून पाठवायचा आहे. त्यापैकी पहिल्या ३० सेकंदांच्या भागात स्वतः किंवा स्वतःच्या कुटुंबीयासह योगाचे प्रात्यक्षिक करतानाचे चित्रीकरण असावे. दुसऱ्या ३० सेकंदांच्या भागात तंबाखूमुक्तीबाबतीतचे आपले विचार मांडायचे आहेत. दोन्हींचा एकत्रित एक मिनिटाचा व्हिडिओ येत्या २१ जूनपर्यंत 8805475345 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायचा आहे.
सहभागी उत्कृष्ट ३० स्पर्धकांना प्रशस्तिपत्र आणि सर्वोत्कृष्ट २० स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन आयोजक संस्थांतर्फे गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. अश्फाक काझी आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. शैलेश गावंडे यांनी केले आहे.
One comment