रत्नागिरी : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) या संस्थेने आंबडवे (ता. मंडणगड) या बाबासाहेब आंबेडकरांच्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी संस्थेचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे गुरुवारी (ता. १८) स्वतः गावाला भेट देणार आहेत.

दलितहितासाठी कार्य करणारे मिलिंद प्रह्लाद कांबळे यांची सारीच कारकीर्द वेगळी आहे. नांदेड येथे शासकीय पॉलिटेक्निकमधून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगची पदविका घेतली. या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत काम केले. शिक्षण आणि ते मातंग समाजाचे असल्याने आरक्षणाच्या भरवशावर त्यांना शासकीय नोकरी मिळू शकली असती. पण आरक्षणातून नोकरी करायची नाही, असे त्यांनी ठरवले. तसेच नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्याची भूमिका घेण्यासाठी स्वतःचे विश्व निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. यथावकाश सीमा कदम या बौद्ध तरुणीशी त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. त्यांनी २००५ मध्ये ‘फॉर्च्यून कन्स्ट्रक्शन’ ही कंपनी स्थापन केली. त्याच वर्षी १४ एप्रिल २००५ रोजी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करून भारतीय उद्योगाच्या इतिहासात मैलाचा दगड रोवला. दलित उद्योजक तयार करणे, उद्योजकांना बळ देणे, यातून आर्थिक प्रगती करून दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी डिक्कीची स्थापना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या कांबळे यांनी त्यांच्यावर एक मोठी वेबसाइट बनवण्याचे ठरवले. तब्बल ७ हजार पाने आणि हजारावर छायाचित्रांसह संपूर्ण माहितीयुक्त वेबसाइट तयार करण्यासाठी त्यांनी आपला व्यवसायही बंद केला. मात्र दलितांसाठी उद्योगांची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेणारे मिलिंद कांबळे यांना त्यांच्या कार्यासाठी २०१३ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
आंबडवे (ता. मंडणगड) हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आहे. नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने त्या गावात फार मोठे नुकसान झाले. सर्वच घरांचे पत्रे उडून गेलेल्या ग्रामस्थांना बाबासाहेबांच्या स्मारकामुळे वादळात आश्रय मिळाला. गावातील वीजपुरवठा खंडित झाला. शेतीचे आणि इतरही मोठे नुकसान झाले. अशा स्थितीत आंबडवे गावाचे पुनर्वसन करण्यासाठी श्री. कांबळे उद्या आंबडवे गावाला भेट देणार आहेत. गावाचे पुनर्वसन आणि इतर सर्व अडचणी सोडवून विविध प्रकारच्या सोयीसुविधा गावात निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी आणि डिक्की संस्थेने केला आहे. गावातील प्रत्येक घरासाठी पत्रे, एलईडी दिवे शिवाय जीवनावश्यक वस्तूंचे आणि अन्नधान्याचे किट त्यांच्यातर्फे दिले जाणार आहे.
…………………….
