पोषकद्रव्य देणाऱ्या अप्रचलित पाककृतींची आगळीवेगळी स्पर्धा

कुडाळ : आजच्या करोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवून आजारापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी रोजच्या अन्नात सर्व प्रकारचे आवश्यक घटक यावेत, असा विचार करून वेगवेगळ्या पाककृती तयार करणाऱ्यांसाठी आगळीवेगळी पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आकर्षक बक्षिसे असलेल्या या “सुगरणींचा खजाना” स्पर्धेत भाग घेण्याची मुदत येत्या ३० जुलैपर्यंत आहे.

आजच्या करोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवून आजारापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी रोजच्या अन्नात सर्व प्रकारचे आवश्यक घटक यावेत, अन्न रुचकर, चविष्ट सहज पचणारे आणि शरीराला हितकारक असावे. घरीच रुचकर अन्न मिळत असल्याने मुलांची बाहेर खाण्याची आवड कमी व्हावी, त्यायोगे सुदृढता, सशक्तपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, या उद्देशाने “सुगरणींचा खजाना स्पर्धा” हा व्हॉट्स अॅप ग्रुप बनविण्यात आला आहे. त्याद्वारे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाककृतींमधून नव्या, रुचकर अनेक पोषकद्रव्ये असलेल्या पदार्थांच्या रेसिपीचे पुस्तक प्रसिद्ध करून ते अॅपद्वारे जगभर पोहोचविण्याचा मानस आहे. पाककलेत निपुण असणाऱ्या ज्या महिलांना या पुस्तकासाठी पाककृती पाठवायच्या आहेत आणि स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी 9422369826 या मोबाइल क्रमांकावरून “सुगरणींचा खजाना” स्पर्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. आपल्या नव्या पाककृती असलेले मेसेज पाठवावेत. आपल्या माहितीतील महिलांना या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची विनंती करावी. मात्र कोणाच्याही संमतीशिवाय त्यांच्या पाककृती आणि नावे ग्रुपमध्ये सामील करण्यासाठी पाठवू नयेत.

त्यानंतर आपल्या नवीन पाककृती लिहून किंवा टाइपसेट करून पोस्टाने किंवा कुरिअरने सोबत दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात. पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पदार्थाची कृती, त्यात घालायच्या वस्तूंचे प्रमाण सविस्तर लिहून पाठवावे. लिखाण सुवाच्च असावे किंवा टाइपसेट केलेले असावे. लेखावर पाठविणाऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर असावा. ज्या पदार्थाची कृती आपण पाठवणार आहात, तो प्रचलित म्हणजे इडली, डोसा वगैरे नसावा. पदार्थाचा फोटो पाठवावा. पोषकद्रव्ये भरपूर असलेले पदार्थ असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
नवीन चविष्ट पदार्थ बनविण्याची कृती पाठवणाऱ्या तसेच उत्तम, पोषक आहाराच्या पाककृतींमधून आहार तज्ज्ञांमार्फत तीन क्रमांक निवडले जातील. प्रथम क्रमांकाला दहा हजार, द्वितीय क्रमांकाला आठ हजार, तर तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी संबंधित पाककृती पाठविण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०२० पर्यंत आहे.

पाककृती पाठविण्याचा पत्ता – अशोक वासुदेव प्रभू, द्वारा डॉ. स्वाती प्रभू, डॉक्टर प्रभूज होमिओपॅथी,
आंबेडकर पुतळ्याजवळ, मेन रोड, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग – 416520.
…….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply