टाटा पॉवर महाराष्ट्रात उभारणार १०० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

मुंबई : महाराष्ट्रात १०० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा प्रकल्प महावितरण (एमएसईडीसीएल) कंपनीकडून टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) या कंपनीला मिळाला आहे. या संदर्भात ‘एमएसईडीसीएल’कडून ‘टीपीआरईएल’ला पत्र पाठविण्यात आल्याचे टाटा पॉवर कंपनीकडून घोषित करण्यात आले आहे. टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी ही भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी असलेल्या ‘टाटा पॉवर’ची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

‘टीपीआरईएल’तर्फे ‘एमएसईडीसीएल’ला वीज खरेदी करारांतर्गत (पीपीए) वीजपुरवठा केला जाईल. हा करार वीजपुरवठा कार्यान्वित झाल्याच्या तारखेपासून २५ वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल. ‘एमएसईडीसीएल’ने डिसेंबर २०१९मध्ये पाचव्या टप्प्यांतर्गत जाहीर केलेल्या बोलीमध्ये ही ऑर्डर ‘टीपीआरईएल’ने मिळवली आहे. कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत हा प्रकल्प सुरू करणे ‘टीपीआरईएल’ला आवश्यक राहील.

याबाबत बोलताना ‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘महाराष्ट्रात १०० मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प मिळाला, ही घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व ‘एमएसईडीसीएल’च्या अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. या करारामुळे अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्याची आमच्या कंपनीची एकूण क्षमता ३५५७ मेगावॉट इतकी होईल.’

‘‘जीयूव्हीएनएल’कडून मिळालेल्या कराराची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, तसेच प्रकल्प विकास, अभियांत्रिकी आणि अंमलबजावणीच्या क्षमता यांच्या पूर्ततेविषयी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या क्षमता वाढविणे, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि सर्व कामांमध्ये उच्च मापदंड निर्माण करणे हे आमचे कार्य यापुढेही सुरू ठेवू, याची आम्ही हमी देतो,’ असे ‘टाटा पॉवर’चे रिन्यूएबल्स विभागाचे प्रमुख आशिष खन्ना यांनी सांगितले.

या प्रकल्पातून दर वर्षी सुमारे २४० मेगायुनिट इतक्या ऊर्जेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. दर वर्षी सुमारे २४० दशलक्ष किलो कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन या प्रकल्पामुळे थांबवले जाऊ शकेल.

‘टाटा पॉवर’ची अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता या प्रकल्पामुळे ३५५७ मेगावॉटपर्यंत वाढणार आहे. आतापर्यंत २६३७ मेगावॉट क्षमतेचे ऊर्जाप्रकल्प कार्यान्वित झालेले असून, या नव्या करारातील १०० मेगावॉट क्षमतेसह ९२० मेगावॅट ऊर्जाप्रकल्प कार्यान्वित व्हायचे आहेत.
……..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply