पद्म पुरस्कारांसाठी तुम्हीही योग्य व्यक्तीची शिफारस करू शकता! १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली : सामाजिक प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दर वर्षी प्रजासत्ताकदिनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची शिफारस करण्याची संधी आता सर्वसामान्य नागरिकांनाही देण्यात येते. २०२१च्या पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी दाखल दाखल करण्याची सुरुवात एक मे २०२० रोजी झाली असून, त्यासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर ही आहे. https://padmaawards.gov.in या पोर्टलवर ही नामांकने ऑनलाइन दाखल करता येणार आहेत.

पद्म पुरस्कारांमध्ये मुख्यत्वे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांचा समावेश आहे. १९५४पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दर वर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. अतिशय उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. समुदाय, व्यवसाय, पत किंवा लिंग याबाबत कोणताही भेदभाव यासाठी केला जात नाही. सार्वजनिक उपक्रमातील डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता, सार्वजनिक उपक्रमांसह सरकारी कर्मचारी या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कार हे जनतेचे पद्म पुरस्कार व्हावेत (पीपल्स पद्म) यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच या पुरस्कारांसाठी आपणास योग्य वाटत असलेल्या व्यक्तींची नामांकने/शिफारशी पाठवाव्यात, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. स्वतःचे नामांकनही करण्याची सोय यात आहे.

या नामांकन/शिफारशीबाबतचा प्रस्ताव पद्म पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील सर्व तपशीलासह सादर करण्याची आवश्यकता आबे. शिफारस केलेल्या व्यक्तीच्या संबंधित कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय आणि असामान्य कामगिरीची माहिती या तपशीलामध्ये जास्तीत जास्त ८०० शब्दांमध्ये द्यायची आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्ये, केंद्रशासित प्रदेशांची सरकारे, भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते, उच्च गुणवत्ताप्राप्त संस्था यांना असे आवाहन केले आहे, की त्यांनी महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांमधून खऱ्या अर्थाने सर्वोत्तम आणि असामान्य कामगिरी करणाऱ्या गुणवान व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी होण्याकरिता एकत्रितपणे प्रयत्न करावेत.

या संदर्भातील अधिक तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (www.mha.gov.in) या वेबसाइटवर अॅवॉर्डस् अँड मेडल्स या विभागात उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित निकष आणि नियम वेबसाइटवर https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकवर उपलब्ध आहेत.
……

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply