रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित मृतांच्या संख्येत चौघांची भर

रत्नागिरी : जिल्ह्यात करोनाबाधित मृतांची संख्या आज (ता. २८) चारने वाढली असून ती आता ५७ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात नव्या ७३ रुग्णांची भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे १० रुग्ण आज आढळले.

मुरडव (ता. संगमेश्वर) येथील एका ४५ वर्षीय रुग्णाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्या रुग्णाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. पेठकिल्ला, रत्नागिरी येथील ४० वर्षीय करोना रुग्ण, मिरकरवाडा, रत्नागिरी येथील ४० वर्षीय महिला आणि कालुस्ते, चिपळूण येथील ८० वर्षीय व्यक्तीचाही करोनाविषयक उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ५७ झाली आहे. मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी १४, खेड ६, गुहागर २, दापोली ११, चिपळूण १०, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ४, मंडणगड १.

दरम्यान, आज दिवसभरात जिल्ह्यात नवे ७३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या एक हजार ६९१ झाली आहे. नव्या बाधित रुग्णांचे विवरण असे – जिल्हा कोव्हिड रुग्णालय, रत्नागिरी – ३४, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २४ रुग्ण, कळंबणी, खेड – २ रुग्ण, गुहागर – ५ रुग्ण, दापोली ८ रुग्ण.

बरे वाटल्याने आज ४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक जहार १०२ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालय ३, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली ३ , उपजिल्हा रुग्णालय, कामथे ३, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन ७, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड १९ आणि कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथील १३ जण आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०२ आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे १० करोनाबाधित

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्या १० करोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील ७ आणि सावंतवाडी तालुक्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३४२ झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७६6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

करोनामुक्त रुग्णाचे पुष्पवृष्टीने स्वागत

करोनावर मात करणारा रुग्ण घरी येताना सोसायटीच्या परिसरात त्याच्यावर पुष्पवृष्टी करून आणि त्याचे औक्षण करून स्वागत करण्याचा स्तुत्य उपक्रम आज (ता. २८) दुपारी रत्नागिरीतील साळवी स्टॉप परिसरात राबवण्यात आला. स्थानिक रहिवाशांनी या रुग्णाचे स्वागत करत ‘करोनाला घाबरू नका, त्यावर मात करता येते’ असा सकारात्मक संदेश समाजाला दिला.

जगभरात करोनाने कहर मांडला आहे. रत्नागिरी शहर, तालुक्यात आणि जिल्ह्यातसुद्धा करोनाचे दीड हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तेवढ्याच संख्येने दररोज रुग्ण करोनावर मात करून रुग्ण आपापल्या घरी जात आहेत. अशाच एका रुग्णाचे निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज त्याला घरी पाठविण्यात आले. त्याला घरी पाठविण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी या रुग्णाचे आनंदाने स्वागत करण्याचे ठरवले. दुपारी त्यांचे पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच घरी पोहोचताच औक्षण करण्यात आले. टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.

या उपक्रमात रुग्णाच्या घरातील मंडळी, नातेवाईक, डॉ. श्रीनिवास कुंभारे, डॉ. अभय धुळप, मेधा कुळकर्णी, शिल्पा मराठे, पमू पाटील, ऋतुजा कुळकर्णी, नगरसेवक उमेश कुळकर्णी, परिसरातील मंडळी उमाकांत सनगर, राजू केणी, किशोर मालगुंडकर, केतन सनगर, मंजूषा बुंधाळे, जर्नादन पुनसकर यांचा सहभाग होता. याप्रसंगी डॉ. कुंभारे यांनी सांगितले की, करोना बरा होतो, घाबरून जाऊ नये. वेळीच वैद्यकीय उपचार घेऊन यावर मात करता येते, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply