कोकण कृषी विद्यापीठात रानभाज्या पाककृती स्पर्धा; अपर्णा तलाठी प्रथम

दापोली : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागामार्फत नुकतीच रानभाज्यांच्या पाककृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अपर्णा तलाठी यांनी बनविलेल्या ‘रानभाज्यांची खांडवी’ या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच, प्रिया बेलोसे यांनी बनविलेली ‘सुरणाची खीर’ दुसऱ्या क्रमांकाची, तर निशिगंधा कुडाळकर यांनी तयार केलेली ‘टाकळ्याची तंबळी’ तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, केवळ विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कुलगुरूंच्या पत्नी डॉ. इंदू सावंत, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, तसेच विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.
पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे एक हजार रुपये, ७५० रुपये आणि ५०० रुपये यांसह प्रशस्तिपत्र व विद्यापीठ दैनंदिनी भेट देऊन कुलगुरू, तसेच डॉ. महाडकर आणि डॉ. इंदू सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘पेव्याच्या पानांची भाजी’ आणि ‘रानभाज्यांचा मिक्स पराठा’ या अनुक्रमे धनश्री सामंत आणि युगंधरा सावंत यांनी बनविलेल्या पदार्थांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या दोघींचाही प्रशस्तिपत्र व विद्यापीठ दैनंदिनी भेट देऊन डॉ. इंदू सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत, तसेच इतर मान्यवरांनी विजेत्यांचे आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि त्यांना षुभेच्छाही दिल्या.
या वेळी सौ. तलाठी, सौ. बेलोसे आणि श्रीमती कुडाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. ‘आम्हा कर्मचाऱ्यांना कार्यालयातील नेहमीच्या कामापेक्षा हा एक वेगळा अनुभव होता. यासाठी विविध रानभाज्या, त्यांच्यातील पौष्टिकता, त्यांच्यापासून बनणारे पदार्थ यासंबंधीचा थोडा अभ्यास करावा लागला. स्पर्धेची तयारी, तेथील मांडणी या बाबींमध्येही आम्ही खूप आनंद घेतला,’ असे त्या म्हणाल्या.

या स्पर्धेमध्ये २६ स्पर्धकांनी एकूण ४१ पाककृती प्रदर्शित केल्या होत्या. स्पर्धकांनी रानभाज्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, भजी, थालीपीठे, चटण्या, पराठे, खीर, कटलेट, केक अशा विविध पाककृती सादर केल्या होत्या.
कृषी महाविद्यालयाच्या मृद् आणि रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापिका सौ. पूजा सावंत आणि सहायक कुलसचिव सौ. अपर्णा जोईस यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विस्तार शिक्षण विभागातील वरिष्ठ संषोधन सहायक प्रवीण झगडे, कनिष्ठ संशोधन सहायका शिल्पा नाईक, कृषी सहायक नरेश आईनकर, समीर उसरे, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार, चंद्रकांत साळवी, गीता पवार, तसेच वाहनचालक सुरेश जाधव यांचे सहकार्य लाभले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply