देवरूख : कोकणातील जिल्हाबंदी उठवून नागरिकांना त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी शासनाकडे केली आहे.
एमएमआर क्षेत्रात ठाणे, मुंबई, पनवेल, विरार ते मुंबई असा प्रवास नागरिकांना विना ईपास करता येतो. तेथे चार जिल्ह्यांतील नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी ये-जा करू शकत आहेत. त्याच धर्तीवर कोकणातही आवश्यक ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुक्त फिरू द्यावे, असे श्री. खंडागळे यांचे म्हणणे आहे.
जिल्हाबंदी असल्याने कोकणातील अनेक नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. छोट्या-मोठ्या व्यावसायिक कामांना ई-पास मिळत नाहीत. केवळ जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगाराच्या फार मोठ्या संधी आहेत अशातला भाग नाही. गेले चार महिने जिल्हाबंदी आहे. या जिल्हाबंदीने कोकणची आर्थिक नाकेबंदी केली आहे. एमएमआर क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता जास्त असतानाही तेथे प्रवासबंदी नाही, अथवा प्रवासासाठी ईपास लागत नाही. मग कोकणात लोकसंख्या घनता कमी असताना जिल्हाबंदी का, असा सवालही खंडागळे यांनी उपस्थित केला आहे. अनेक नागरिक जवळच्या जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येऊ पाहत आहेत. जिल्हाबंदीमुळे अनेकांना वैयक्तिक पास मिळत नाहीत.खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांना मात्र प्रवासी वाहतूक करता येते. त्यातून प्रवाशांची लूट सुरू आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते जिल्ह्यात येतच आहेत. जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी, स्वतंत्र व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि सामान्य नागरिक, गरीब माणसांचा प्रश्न आहे. त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक चाकरमानी लॉकडाउनमुळे कोकणात अडकून पडले आहेत. अनेकांना कामानिमित्त जवळच्या जिल्ह्यात जावे लागत असते, अशा नागरिकांचीदेखील अडचण झाली आहे. सध्या कोकणातील नागरिकांत करोनाबाबत योग्य ती जनजागृती झाली असून नागरिक काळजी घेत आहेत. कोकणची अर्थव्यवस्था आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यांमधील शहरांशी निगडित आहे. अशा स्थितीत येथील आर्थिक व्यवहारांना चालना मिळणे गरजेचे आहे. राज्य शासनाने आता तरी सर्वसामान्य जनतेच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हाबंदी उठवावी, अशी नागरिकांची मागणी असल्याचे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media