रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यांचा करोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला.
नैसर्गिक आपत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामध्ये करोनाची भर पडत आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच समाजसेवक तसेच सरकारला तातडीची मदत करणारे सरकारनियुक्त पोलीस पाटलांचाही प्रत्येक आपत्तीमध्ये मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे, हे आजवर प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याने अनुभवले आहे. सर्वत्र करोनाची साथ जोरात आहे. रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. या काळात पोलीस पाटलांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पोलीस पाटलांनी यापुढेही समाजकार्यात असेच झोकून द्यावे, समाजहिताचे काम करत राहावे, असे आवाहन डॉ. मुंढे यंनी यावेळी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामध्येही पोलीस पाटलांनी खांद्यावर कुऱ्हाडी घेऊन प्रत्यक्ष साफसफाई करण्याचे कामही केले. तत्काळ झाडे तोडून मार्ग मोकळा करून दिला. हे काम मोलाचे आहे. पुढच्या वाटचालीसाठी पोलीस पाटलांना शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.
जिल्हा पोलीस मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील ७० आणि शहरी भागातील १५ पोलीस पाटलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. खेडशी येथील पोलीस पाटील शलाका सावंतदेसाई यांचा त्यामध्ये समावेश होता. उपस्थित सर्व पोलीस पाटलांना करोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाला रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक अनिल लाड, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम आदी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media