मालवण : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रावरही दुष्परिणाम झाला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर बसले आहेत, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान केले जात आहे, ही नेहमीची प्रक्रिया सुरू व्हायला आणखी किती काळ जाईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे साऱ्यांचेच लक्ष वळले आहे. शिक्षण विभागानेही आता त्याला मान्यता दिली आहे. त्याकरिता शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जण विविध उपक्रम राबवत आहेत. अनेक अॅप्स तयार केली जात आहेत; पण पंचायत समितीने पुढाकार घेऊन अॅप तयार करण्याचा पहिलाच प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समितीने राबविला आहे. ‘विद्यालय’ असे या अॅपचे नाव असून, मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहात नुकतेच या अॅपचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते झाले. (अॅपची लिंक शेवटी दिली आहे.)
कसे आहे ‘विद्यालय’ अॅप?
तिसरी ते सातवी या वर्गांचा अभ्यासक्रम स्मार्ट पीडीएफच्या माध्यमातून या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच स्वाध्यायासाठीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विषयाच्या अधिक माहितीसाठी यू-ट्यूब लिंक देण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे व्हिडिओरूपात विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑफलाइनही काम करत राहते. केवळ अॅप डाउनलोड करण्यासाठी इंटरनेटची गरज असते. त्यानंतर इंटरनेट उपलब्ध नसले तरी ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थी शिकू शकतात. याचा अधिक फायदा इंटरनेट सेवा नसलेल्या किंवा ती सतत खंडित होणाऱ्या भागांमध्ये होऊ शकेल. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अॅप साकारणारे तंत्रस्नेही शिक्षक व तंत्रज्ञ यांचा सन्मान
मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी या अॅपची संकल्पना मांडली होती. मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले जिल्हा परिषदेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी हे अॅप प्रत्यक्षात उतरवले. मालवण शिक्षण विभागाचे तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे, विनीत देशपांडे, गुरुनाथ ताम्हणकर, परशुराम गुरव, दिनकर शिरवलकर, भागवत अवचार यांच्यासह तंत्रज्ञ नंदकिशोर हळदणकर यांनी या अॅपची रचना केली आहे. या टीमचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हे सातही शिक्षणवीर असून, त्यांनी इंग्लिश स्पीकिंग डे हा उपक्रम शाळा स्तरावर यशस्वीरीत्या राबविला होता.
डॉ. हेमंत वसेकर यांनी ‘मल्टिटॅलेंटेड पराडकर’ अशा शब्दांत श्री. पराडकर यांचे कौतुक केले. जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्याने केलेले हे कौतुक मालवण तालुक्यासाठी अभिमानस्पद म्हणावे लागेल. राजेंद्र पराडकर जेथे काम करतात तेथे नावीन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना यशस्वी करणे शक्य असते, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सावी लोके यांनी काढले.
(‘विद्यालय’ अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे. )