स्वच्छ भारत सर्वेक्षणात रत्नागिरीला देशपातळीवर दहावे स्थान, वेंगुर्ले पंधराव्या स्थानावर

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपालिका एक लाख लोकसंख्या गटात पश्चिम विभागात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवर दहावा क्रमांक मिळवत स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार प्राप्त करणारी नगरपालिका ठरली आहे. वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) नगरपालिकेने या स्पर्धेत पंधरावे स्थान पटकावले आहे.

आज (२० ऑगस्ट) नवी दिल्ली येथून या स्वच्छ भारत सर्वेक्षणातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. अर्बन अफेअर्स अँड हाउसिंग मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत दिल्लीतून हा कार्यक्रम झाला. रत्नागिरी पालिकेला ५० हजार ते एक लाख नागरी संख्येच्या गटात स्थान देण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील एकूण ४२ शहरांची निवड करण्यात आली.

रत्नागिरी शहराने सलग तिसऱ्या वर्षी स्थान प्राप्त केले आहे. कचरानिर्मितीच्या ठिकाणी संकलन करून त्याचे एकत्र गोळा झाल्यानंतर केलेले वर्गीकरण, शहरात १०० टक्के कचरा संकलन, कचऱ्यातून खतनिर्मिती, प्लास्टिकवर प्रक्रिया तसेच घातक कचऱ्यावर प्रक्रिया आदी प्रकल्प पालिकेने उभे केले आहेत. त्याकरिता शहराची निवड झाली. शहराने ओडीएफ++ (ODF++) मानांकन मिळविले असून, कचरामुक्तीबाबत शहराला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.

रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिक, पदाधिकारी, शाळा, संस्था, एनजीओ तसेच पत्रकारांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले.

वेंगुर्ले राज्यात बाराव्या स्थानी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगरपालिकेला या स्पर्धेत देशपातळीवर १५वा आणि महाराष्ट्रात १२वा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी देशात थ्री स्टार रँकिंगमध्ये (कचरामुक्त शहर) पालिकेला पहिल्या १२मध्ये स्थान मिळाले होते. या वेळी वेंगुर्ले शहराला ओडीएफ ++ चा दर्जा मिळालेला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण १८ आणि १९ मध्ये शिल्लक राहिलेली बक्षिसाची ५० टक्के म्हणजे सव्वासहा कोटी रुपयांची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या तीनमध्ये क्रमांक मिळविण्याचा मानस असल्याचे वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप ऊर्फ राजन गिरप यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply