अशोक पत्की यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त अनुभवा त्यांची ऑनलाइन मैफल

पुणे : जाहिरातींच्या छोट्या जिंगल्सपासून मालिकांच्या शीर्षकगीतांपर्यंत आणि भावगीते, भक्तिगीतांपासून चित्रपटांतील गाण्यांपर्यंत अशा संगीताच्या क्षेत्रात चौफेर आणि संस्मरणीय कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार म्हणजे अशोक पत्की. २५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा ८०वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने, तसेच, गणेशोत्सवाचे औचित्य साधून पुण्यातील ‘सुरभी’ या संस्थेने ‘सप्तसूर माझे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला असून, तो भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी, २३ ऑगस्ट २०२० रोजी रात्री साडेआठ वाजता होणार आहे. (ईएसटी अर्थात इस्टर्न स्टँडर्ड टाइमनुसार हा कार्यक्रम २३ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे.) या कार्यक्रमात अशोक पत्की स्वतः सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाची संकल्पना माधुरी कुलकर्णी यांची असून, सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्या स्वतःच सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाचा काही भाग रेकॉर्डेड असेल; मात्र अशोक पत्की स्वतः यात सहभागी होणार असून, त्यांची मुलाखत माधुरी कुलकर्णी घेणार आहेत. ही मुलाखत लाइव्ह असेल आणि अर्थातच ती त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी असेल. अशोक पत्की यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा आस्वाद या कार्यक्रमात रसिकांना विविध गायकांच्या सादरीकरणातून घेता येणार आहे. या गायकांमध्ये हृषीकेश रानडे, आर्या आंबेकर, माधुरी करमरकर, हृषीकेश बडवे आणि सुरभी ढोमणे यांचा समावेश आहे.

दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, सुरेश वाडकर, राजेंद्र तलक, साधना सरगम, देवकी पंडित, प्रवीण दवणे आणि आर्या आंबेकर हे मान्यवर कलावंत अशोक पत्की यांच्याविषयीचे आपले मनोगत या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन व्यक्त करणार आहेत.

हा कार्यक्रम झूम अॅप्लिकेशनवरून प्रसारित होणार असून, त्यासाठी तिकीट दर पाचशे रुपये आहे. अमेरिका किंवा परदेशातील रसिकांसाठी हा दर ११.३० डॉलर एवढा आहे. https://www.hungamacity.com/ या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply